पुणे जिल्ह्यात पावसाच्या सरी 

प्रतिनिधी
सोमवार, 24 जून 2019

पुणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत शनिवारी (ता. २२) पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शनिवारी सायंकाळी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सायंकाळी हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता.

पुणे  - पुणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत शनिवारी (ता. २२) पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शनिवारी सायंकाळी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सायंकाळी हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. धरणक्षेत्र परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्याने भात रोपवाटिकेच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. 

जिल्ह्यात शनिवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. दुपारनंतर पुणे शहरासह परिसरात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्याने झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. पुणे शहरासह, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रविवारी (ता. २३) दिवसभर हवामान ढगाळ होते. घाटमाथ्यावर अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या. पानशेत धरणाच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाला. वरसगाव, पवना, भाटघर व वडिवळे, गुंजवणी, मुळशी, भामाआसखेड, खडकवासला, टेमघर, कळमोडी, निरादेवधर, कासारसाई, आंद्रा, डिंभे, वडज, माणिकडोह या धरणांच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नांगरणी, वखरणी करून भात रोपवाटिकेच्या तयारीला शेतकऱ्यांनी चांगलाच वेग दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Pune district