पावसाने झाड पडले...आणि मला ब्रम्ह्मांड दिसले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पडलेल्या झाडाकडे बघून माझ्या डोळ्यासमोर तर ब्रम्ह्मांड उभे राहिले...किशोर जगताप बोलत होते.

पुणे - कडकड करत ते भलं मोठं झाडं अक्षरशः रस्त्यावर कोसळलं. काही क्षणाचा उशीर हा आमच्या जिवावर बेतला असता. पडलेल्या झाडाकडे बघून माझ्या डोळ्यासमोर तर ब्रम्ह्मांड उभे राहिले...किशोर जगताप बोलत होते. बोलताना आवाज कापरा झाला होता. त्यांची नजर फक्त एकटक आपल्या तीन वर्षांच्या पूर्वाकडे होती.

गिरणीचा उद्योग करणारे जगताप 'सकाळ'शी बोलत होते. ते म्हणाले, "गुरुवारी दुपारी शहरात अचानक पावसाचे थेंब पडू लागले. काही कळायच्या आत पावसाचा जोर भयंकर वेगाने वाढला. प्रभात चित्रपट गृहापासून बाजीराव रस्ता ओलांडून जाईपर्यंत कपडे ओलेचिंब झाले. तेथे असलेल्या रिक्षेत सुरवातीला वयोवृद्ध आईला बसविले. पूर्वाला रिक्षेत ठेवले. तिच्या पाठोपाठ पत्नी आणि मी रिक्षेत बसलो. प्रभात चित्रपट गृह ते बाजीराव रस्त्यावरील दक्षिण मुखी मारुती मंदिरापर्यंत एक मिनीटदेखिल लागला नसेल. भर पावसात रिक्षातून बसून दक्षिण मुखी मारुती मंदिर ओलांडले आणि इतक्‍यात कडाडकडकड असा आवाज करत ते झाडं रस्त्यावर पडलं. रिक्षावाल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला घेतली. मागे वळून पाहतो तर त्या झाडाच्या खाली पार्क केलेली दुचाकी अडकली होती. ते दृष्य बघताच भर पावसात अंग घामाघुम कसे होते, याचा अनुभव आला.'' 
rain pune

काही क्षण उशीर झाला हा आमच्या जिवावर बेतला असता. या रिक्षेत माझी पूर्वा होती. तिचे काय झाले असते, या कल्पनेनेच माझ्या डोळ्यासमोर अवघे ब्रम्ह्मांड दिसले, हे सांगत असताना त्यांच्या आवाजातील कंप जाणवत होता. यानंतर तातडीने येऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी खुले केला आहे. 

rain pune

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rain in pune trees collapse