शहरात ऊन-पावसाचा खेळ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पुढील तीन दिवस पावसाचे
शहरात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. यादरम्यान जोरदार वारे वाहणार असून, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा ‘ऑरेंज ॲलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे.

पुणे - शहरात आज ऊन-पावसाचा खेळ रंगला. एकामागून एक पडलेल्या जोरदार सरींमुळे कोथरूड, स्वारगेट, शिवाजीनगर, औंध भागातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहिले. परंतु, याच वेळी सिंहगड रस्त्यावरील धायरी, नांदेड आणि कात्रज परिसरातील काही भागांत कडक ऊन जाणवत होते.

शहर आणि परिसरात सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. सकाळी दहा वाजता ‘ऑक्‍टोबर हीट’प्रमाणे उन्हाचा तडाखा लागत होता. हवेत सध्या ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आर्द्रता आहे.

सकाळी कडक ऊन, दुपारी ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पाऊस, असे वातावरण सलग तिसऱ्या दिवशी पुणेकर अनुभव आहेत. आज दुपारी बारा वाजता उन्हाचा चटका वाढत असतानाच कोथरूडमध्ये जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसाने कोथरूडमधील रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Pune Water Monsoon