पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (एनएचएआय) दिल्या आहेत.

पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (एनएचएआय) दिल्या आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिस, एनएचएआय, पुणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. २०) झाली. कात्रज ते देहूरोड बाह्यवळण महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. दरवर्षी या रस्त्यावर शेकडोने अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, खडी परसलेली आहे. त्याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अपघात होत आहेत. या मुद्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. 

यासंदर्भात वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, ‘‘कात्रज ते चांदणी चौक यादरम्यान वारजे येथील मुठा नदीवरील पूल, डुक्करखिंड, माई मंगशेकर रुग्णालय, वडगाव पूल या ठिकाणच्या चार ‘ब्लॅक स्पॉट’वर गेल्या वर्षभरात सुमारे १०० अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाला आहे. या चार अपघात स्थळांसह अन्य ठिकाणीही रस्ता धोकादायक झाला आहे. नवले पूल ते कात्रज चौक यादरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, सेवारस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गाला जोडणारे पुणे शहारातील रस्तेही दुरुस्त करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या; तसेच राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीसाठी दर महिन्याला एक बैठक घेतली जाणार आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Road Hole