पिंपरी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही बरसला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

आजही पाऊस?
दोन दिवसांपासून सुरू असणारा पाऊस सोमवारीही (ता. २१) कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मतदानाच्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला तर त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो.

पिंपरी - दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी आपला मुक्‍काम कायम ठेवल्यामुळे नागरिकांची रविवारची सुटी पाण्यात गेली. 

शनिवारपासून (ता. १९) बरसणाऱ्या पावसाने अद्याप विश्रांती घेतली नाही. त्याचे सावट सोमवारी (ता. २१ ) होणाऱ्या मतदानावर आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे रावेत बंधारा ओसंडून वाहत असून, शहरात पुन्हा एकदा खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 

शहरात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे अनेक रस्त्यावर पाणी साठल्याने वाहनांना अडकून पडावे लागल्याचे चित्र आहे. 

रावेत, चिंचवड, प्राधिकरणासह अनेक परिसरात पावसामुळे पुन्हा खड्‌डे झाले असून, त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

पावसाने उघडीप घेतली त्यावेळी पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. आता ते पुन्हा उखडले आहेत. 

शहरातील अनेक मतदान केंद्राच्या परिसरात पाणी साठल्याचे चित्र पाहायला मिळाले. पिंपरीमधील काही मतदान केंद्राच्या बाहेर चिखल झाला तर काही ठिकाणी मैदानात पाणी साठले. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांनी सुटीच्या दिवशी घराबाहेर पडण्याचे टाळले, त्यामुळे रस्त्यावर नेहमीच्या तुलनेत कमी गर्दी दिसत होती.

चिखलीत बाजारपेठेवर परिणाम
चिखली - ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने घराबाहेर पडता येत नसल्याने सुटी असूनही खरेदीसाठी बाहेर पडता येत नसल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. त्यामुळे चिखली रोड आणि चिखलीगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. 

चिखली परिसरात शनिवारी (ता. १९) दुपारपासून संततधार सुरू आहे. मंदीचे सावट आणि त्यातच पाऊस यामुळे ग्राहक नसल्याने व्यापारावर मोठा परिणाम झाला. त्यातच दिवाळीसाठी लागणारे साहित्य रस्त्यावर बसून विकणाऱ्या व्यावसायिकांवर पावसाचा परिणाम झाला. दुकानच थाटता येत नसल्याने आणलेला माल कसा विकायचा, ही चिंता त्यांना सतावत आहे. लाखो रुपये खर्च करून फटाका स्टॉल उभारणाऱ्या विक्रेत्यांकडे  ग्राहक नाहीत. 

याबाबत पूजा साहित्याची विक्री करणारे मुकेश वाल्हे आणि विजय माने म्हणाले की, दिवाळीत विक्रीसाठी आकाशकंदील, पणत्या, रांगोळी आदी माल खरेदी केला. दिवाळीपूर्वी १५ दिवस विक्रीस सुरवात होते. मात्र, या वर्षी मंदीचे सावट आणि त्यातच पाऊस यामुळे त्यांच्या विक्रीस अद्याप सुरवात झालेली नाही.

आजही पाऊस?
दोन दिवसांपासून सुरू असणारा पाऊस सोमवारीही (ता. २१) कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मतदानाच्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला तर त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain second day in a row the city of Pimpri