भर पावसाळ्यात चटका

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 23 जुलै 2019

पावसाने विश्रांती घेतल्याने शहर आणि परिसरात उन्हाचा चटका वाढला आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 4.5 ने वाढून 32.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव येथे 36.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार; तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पावसाच्या विश्रांतीमुळे पारा 32 अंशांवर
पुणे - पावसाने विश्रांती घेतल्याने शहर आणि परिसरात उन्हाचा चटका वाढला आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 4.5 ने वाढून 32.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव येथे 36.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार; तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याचे संकेत असल्याने गुरुवारपासून (ता. 25) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्‍यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते जोरदार पावसाने सोमवारी हजेरी लावली; तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप होती. दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडूच्या घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे.

मॉन्सूनचा आस बुधवारपर्यंत (ता. 24) दक्षिणेकडे सरकणार आहे; तसेच त्याची तीव्रताही वाढण्याचे संकेत असल्याने गुरुवारपासून (ता. 25) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुण्यात हलक्‍या सरींची शक्‍यता
शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या दमदार सरींनी विश्रांती घेतली आहे. हलक्‍या सरी हजेरी लावत आहेत. मात्र, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्‍यता 25 ते 50 टक्के असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींची हजेरी यामुळे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Summer Heat temperature