गेला पाऊस कुणीकडे?

माळेगाव (ता. बारामती) - नीरा डावा कालव्यातून खरीप हंगामासाठी सुरू असलेले दुसरे आवर्तन.
माळेगाव (ता. बारामती) - नीरा डावा कालव्यातून खरीप हंगामासाठी सुरू असलेले दुसरे आवर्तन.

माळेगाव - ऑक्‍टोबर महिना उजाडला, तरी अद्यापही जिल्ह्यात बारामती, इंदापूर, पुरंदर आदी तालुक्‍यात गेल्या वर्षीच्या सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. या परिसरात गेल्या वर्षी आजअखेर सरासरी ५०० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र २५० मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. 

पावसाने नीरा डावा कालव्याअंतर्गत येणाऱ्या लाभ क्षेत्रात कमालीची ओढ दिली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना खरिपातील पिके जगविणे आव्हानात्मक ठरू लागले आहे. ऐन पावसाळ्यात एवढी प्रतिकूल स्थिती आहे.

उन्हाळ्यात तर जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, उसाच्या पिकाची काय अवस्था होईल, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. सुदैवाने १५ ऑगस्टपर्यंत भाटघर, वीर, देवघर धरण आदी क्षेत्रात चांगला पाऊस झाला.

त्यामुळे ही धरणे शंभर टक्के वेळेत भरली. परंतु, त्यानंतरच्या कालावधीत नीरा डावा कालव्यांतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रात विशेषतः पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्‍यात पावसाने कमालीची ओढ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खरिपात दुसरे आवर्तन सोडण्याची कधी नव्हे ती वेळ 

जलसंपदा खात्यावर आली. परिणामी, वीर धरणातील पाणीसाठा सध्या ७७ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आगामी काळात उन्हाळी हंगामातील एक आवर्तन कमी होऊ शकते, अशी माहिती जलसंपदा खात्याकडून सांगण्यात येते.

पावसाअभावी खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उभ्या पिकांच्या सिंचनाला प्राधान्य देत जलसंपदा खात्याने दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीटंचाई विचारात घेता शेतकऱ्यांनी सध्यातरी नवीन पिकांची लागवड करू नये. कधी नव्हे ते खरिपात दुसरे आवर्तन सोडल्यामुळे उन्हाळी हंगामातील दोनपैकी एक आवर्तन कमी होण्याची शक्‍यता आहे. परंतु, आगामी काळात जर पाऊस समाधानकारक पडला; तर रब्बी व उन्हाळी हंगामात कालवा सल्लागार समितीने ठरवून दिल्याने वेळापत्रकानुसार सिंचनासाठी पाणी सोडले जाईल.
- अजित जमदाडे, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com