चोवीस तासांत दोन महिन्यांचा पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) 
माणिकडोह २.१३ (२०.९५), येडगाव ०.४८ (२४.४५), वडज ०.६२ (५२.९१), डिंभे ५.७९ (४६.३६), विसापूर ०.०१ (१.४१), कळमोडी १.५१ (१००), चासकमान ५.४३ (७१.६८), भामा आसखेड ४.४८ (५८.४४), वडिवळे ०. ९९ (९२.०४), आंद्रा २.९२ (१००), पवना ४.६४ (५४.५१), कासारसाई ०.४७ (८२.५०), मुळशी १०.४६ (५६.६५), गुंजवणी २.३६ (६३.८८), नीरा देवधर ६.५३ (५५.६७), भाटघर १२.१७ (५१.७९), वीर ६.३८ (६७.७८). 

खडकवासला धरण साखळीत दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस सुरूच
पुणे/खडकवासला - खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत पाणीसाठा सुमारे पावणेतीन अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढला असून, तो शहराला दोन महिने पुरेल इतका आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत प्रकल्पातील एकूण पाणीसाठा १८.११ टीएमसी झाला आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे या चार धरणांमध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून आज पाणीसाठा पावणेतीन टीएमसीने वाढला. धरण क्षेत्रात आज दिवसभरात सरासरी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

कळमोडीनंतर आंद्रा धरण भरले
भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे धरणांतील साठ्यात वाढ होत आहे. कळमोडीनंतर आंद्रा धरणही भरले आहे.

हॅरिस पुलाखालील रस्ता बंद
औंध - पावसामुळे बोपोडी येथील हॅरिस पुलाखाली पाणी साचल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. यामुळे भाऊ पाटील रस्त्याने खडकीकडे जाणारा मार्ग खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्याचे खडकी वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांनी सांगितले. बाणेर-बालेवाडी रस्त्यावरील शिवनेरी सोसायटीसमोर चेंबर तुंबले होते. यामुळे ब्राव्हूरीया सोसायटीपर्यंतचा परिसर जलमय झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Water Khadakwasala Project Water Storage