पुणे : तळेगाव परिसरातील भुयारी पुलाखाली भरले तुडूंब पाणी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

हिंदमाता भुयारी मार्गाला जलतरण तलावाचे स्वरुप

तळेगाव स्टेशन(पुणे) : गुरुवार पासून तळेगाव परिसरात चालू असलेल्या संततधार पावसामुळे हिंदमाता रेल्वे भुयारी पुलाखाली पाण्याचा प्रचंड डोह साचून ओसंडून वाहू लागला.खबरदारी म्हणून नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांनी अडथळे लावून हा मार्ग वाहतुकीस बंद केला.

महिनाभरापूर्वी झालेल्या उद्घाटनानंतर नागरिकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या हिंदमाता भुयारी मार्गाच्या पुलाखाली वारंवार पाणी साचत असल्यामुळे अपवाद वगळता हा मार्ग वाहतूकीसाठी पावसाळ्यात बंदच असल्यासारखा आहे. गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे चोहोबाजुंनी येणारा पाण्याचा मोठा ओघ पुलाखाली जमा होत साचून राहीला. निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरल्याने पाणी साचत जाऊन शुक्रवारी (ता.२६) मध्यरात्रीनंतर अख्ख्या पुलातच पाणी तुंबून ओसंडून वाहू लागले.

तुंबलेले पाणी शेजारील लिटील हर्ट सोसायटी आणि स्वामी विवेकानंद स्कुलच्या आवारापर्यंत पोहोचले. पाण्याचा ओघ चालूच होता त्यामुळे भुयारी मार्गाला जलतरण तलावाचे स्वरुप आले. खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने बॅरिकेडस आणि इशारा फलक लावून हा मार्ग वाहतूकीस बंद केला. नागरिकांनी सोशल मिडीयावर यासंदर्भात फोटो, व्हीडीओ व्हायरल करत, तिखट प्रतिक्रिया देऊन नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवली.

नैसर्गिक ओढयाचा प्रवाह अडवल्याने धोका
भुयारी मार्गाच्या बांधकाम रचनेत रेल्वेमार्गालगत समांतर असलेल्या लगतच्या नैसर्गिक ओढयाचा विचार कंत्राटदार आणि नगरपरिषद प्रशासनाने केला नाही.त्यामुळे नैसर्गिक जलप्रवाहाचे पाणी पाझरुन आणि दुतर्फा दबावाने घळी पाडत पुलाखाली जमा होते. अडलेले पाणी जिरल्याने फुगवटा तयार होऊन त्याचा दाब पुलाच्या बांधकामावर देखील येऊ शकतो.

पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी पुलाच्या पातळीखाली डक्ट तयार करावा लागेल असे मत काही बांधकाम तज्ञांनी व्यक्त केले.मात्र पावसाळ्यात हे काम होणे शक्य नसल्याने सदर भुयारी मार्ग बहुतांश वेळा बंदच राहण्याची शक्यता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain water logging in the Talegaon area under the underground bridge pune