पिंपरी शहरात दिवसभर संततधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पिंपरी - शहरात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने विविध भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रावेत येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते. तर, पवना नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. 

चिखली येथील घरकुल सोसायटीतील शेवटच्या इमारतीत पार्किंगमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तसेच, येथील बसथांब्याच्या परिसरात देखील पाणी साचल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. येथील पावसाळी गटारात दगड टाकलेले होते. हे दगड जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले. मुळानगर (सांगवी) येथील २५ ते ३० झोपड्यांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरले होते. तसेच संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामागील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत नाल्याचे पाणी शिरले होते. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, आशा राऊत, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच, तातडीने आवश्‍यक उपाययोजना सुरू केल्या.

सखल भागांमध्ये पाणी
शहरातील विविध सखल भागांमध्ये आणि रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. पुनावळे, प्राधिकरण-वाल्हेकरवाडी येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले.

प्राधिकरणातील आशीर्वाद कॉलनी, सिद्धिविनायक नगरी परिसरामध्ये काही नागरिकांच्या घरात सांडपाणी वाहिनीचे पाणी शिरले. रावेत-भोंडवे कॉर्नर येथे रस्त्यावर पाणी साचले होते.

Web Title: rain water pimpri