आयटीयनचा रस्ता रोखला पाण्याने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

घटनाक्रम 
सोमवारी (ता. ८) 
मुसळधार पाऊस, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भराव असल्याने पाण्याला वाट मिळाली नाही व मोठा जलाशय साठला 
सायंकाळी चारपासून मध्यरात्रीपर्यंत आयटीयन्स अडकून पडले

मंगळवारी (ता. ९) 
जलाशयामुळे परिस्थिती ‘जैसे थे’, कोंडी कायम
आयटीयन्सचा सोशल मीडिया व इंटरनेटवर याविरोधात लढा
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली दखल
परिस्थिती हाताळण्याचे तहसीलदारांना आदेश

बुधवारी (ता. १०) 
तहसीलदारांनी पोलिस बंदोबस्तात जलाशय खुला केला

हिंजवडी - नैसर्गिक स्रोत बदलून पाण्याचा प्रवाह वळविल्याने माणमध्ये मुख्य रस्त्यावर साठलेल्या जलाशयामुळे आयटीयन्सची कोंडी झाली होती. ही घटना भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे संकेत देऊन गेली. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रस्त्यावर टाकलेल्या मोऱ्या अद्याप पाण्याखाली आहेत.

मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी बुधवारी (ता. १०) पोकलेनने चारी खोदून जलस्रोत खुले करून मार्ग मोकळा केला. मात्र, अचानक आलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसान झाले. याप्रकरणी महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कुणावरही कार्यवाही केली नाही. नैसर्गिक जलस्रोत पूर्ववत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा तहसीलदारांनी बांधकाम व्यावसायिकांसह जलस्रोत अडविणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्याने त्यांनी तूर्तास ते पूर्ववत करण्याचे मान्य केले आहे. 

भराव करण्यासाठी आणलेल्या हजारो ब्रास माती, मुरूम, दगडाचे पंचनामे करून रॉयल्टी स्वरूपात गौण खनिज उत्खननाचा दंड वसूल करण्यास तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले. तशा सूचना त्यांनी थेरगावचे मंडल अधिकारी हेमंत नाईकवडी व माणच्या गावकामगार तलाठ्यांना दिल्या आहेत.

हिंजवडीकडून माणगावमार्गे फेज थ्रीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत डोंगराच्या बाजूला टीसीजी ग्रुपने सुमारे ४५ एकर जमीन एमआयडीसीकडून निवासी गृहप्रकल्पासाठी विकत घेतली. डोंगरदऱ्यातून येणारे पावसाचे पाणी गवारेवाडीच्या ओढ्याला जात होते. मात्र, गेल्या वर्षी त्यांनी सर्व नैसर्गिक प्रवाह एकत्र करून पाणी मुख्य रस्त्यालगत आणून सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांनी यंदा मुरूम, दगड, मातीचा भराव करून भातखाचरे रस्त्यापेक्षा उंच केल्याने पहिल्याच पावसात रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले. सुमारे ५० एकरांहून अधिक क्षेत्राचे पाणी एकाच ठिकाणी साठल्याने रस्त्यावर जलाशय निर्माण झाला व वाहनचालकांना सलग तीन दिवस त्याचा सामना करावा लागला. त्यामुळे शेकडो आयटीयन्सनी सोशल मीडियावर याविरोधात मोहीम उघडत प्रतिक्रियांचा पाऊस पाडल्याचे चित्र होते. 

या पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात घटना घडली नव्हती. सध्या राक्षेवस्ती, बोडकेवाडी परिसरातील ओढे-नाल्यालगत भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशी घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सहा शेतकऱ्यांसह ‘टीसीजी’ला नोटीस
रस्त्यालगत भराव टाकून मोऱ्या बुजविल्याप्रकरणी व बेकायदा रस्त्याच्या जागेत पत्राशेड, व्यावसायिक गाळे उभारल्याप्रकरणी २ जुलैलाच सहा शेतकऱ्यांना नोटीस बजाविल्या. टीसीजी ग्रुपला पाणी सोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नोटीस दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एन. एम. रणसिंग यांनी सांगितले. टीसीजी ग्रुपने त्यांच्या हद्दीतील पाणी वाहिनी टाकून अन्य मार्गाने वळविल्याचे मान्य केले.

निष्काळजीपणा...
एमआयडीसीने प्लॉट विकला तेथे मूलभूत सुविधा पुरवायला हव्या होत्या. बांधकाम व्यावसायिकाला परवाना देताना सुविधांसाठी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करणे आवश्‍यक होते, असे डॉ. यशराज पारखी यांनी सांगितले.

चार महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम झाले. मात्र, अशा पद्धतीने भराव करून रस्त्याची दुरवस्था करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी. 
- सुधीर देशमुख, आयटीयन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Water Road Block IT Company Hinjewadi