दुकानांत शिरले पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पिंपरी - रस्त्याची असमान उंची, बुजलेले पावसाळी गटारांचे आउटलेट, पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे न केलेली या गटारांची स्वच्छता आदी कारणांनी गुरुवारी (ता. २१) झालेल्या पावसामुळे चिंचवडगावातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 

पिंपरी - रस्त्याची असमान उंची, बुजलेले पावसाळी गटारांचे आउटलेट, पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे न केलेली या गटारांची स्वच्छता आदी कारणांनी गुरुवारी (ता. २१) झालेल्या पावसामुळे चिंचवडगावातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 

शहरात कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने अनेक घरे, दुकानांमध्ये पावसाचे, गटारांचे पाणी शिरले. चिंचवडगावातील गांधी पेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. पॉवर हाउस चौकातून उतारामुळे पाणी वेगाने येते. ते सरळ मोरया गोसावी मार्गाकडे जाताना रस्त्याच्या चढणीमुळे वळणावरील लुंकड यांच्या दुकानाजवळ आडून मागे येते. दुसरीकडे जुन्या बस स्थानकावरून येणारे पाणीही उतारामुळे येथे येते. त्यामुळे पाण्याचा लोंढा निर्माण होऊन तो दुकानांमध्ये शिरला. 

किराणा मालाचे विक्रेते सुशांत तलाठी म्हणाले, ‘‘आमच्या दुकानाशेजारील तीनही पावसाळी गटारे तुंबली. त्यामुळे पाणी रस्त्यावर साचून राहिले. रस्त्याने वाहने आली की त्याच्या लाटा निर्माण होऊन पाणी दुकानात शिरले. त्यामुळे साखर, मैदा अशा वस्तूंचे मोठे नुकसान झाले.’’ 

या दुकानाजवळ एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या एटीएम केंद्राच्या बॅटऱ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने बॅटऱ्या जळाल्या. 

संजय तलाठी म्हणाले, ‘‘आमच्या घरातील सर्वांची पादत्राणे पावसाच्या पाण्यात वाहून गेली. ‘सारथी’ हेल्पलाइनवर तक्रार केली होती. परंतु, उपयोग झाला नाही.’’

पुरुषोत्तम तलाठी यांच्या जनरल स्टोअर्सच्या दुकानात पाणी शिरल्याने सुमारे पाच हजार रुपये किमतीच्या मालाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते सतीश देशमुख म्हणाले, ‘‘दुकानात पाणी शिरल्यामुळे माझे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.’’ 
हार्डवेअर वस्तूंचे विक्रेते संजय लुणावत यांनीही दुकानात पाणी शिरल्याने १५ ते २० हजार रुपये किमतीच्या मालाचे नुकसान झाल्याचे सांगितले.

वरचेवर होणाऱ्या डांबरीकरणामुळे रस्त्याची उंची वाढत आहे. त्यातच रस्ता मध्यभागी उंच झाला. त्यामुळे पाणी वेगाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानांमध्ये घुसले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळी गटारांची योग्य सफाई केली नाही. दुकानांपासून रस्ते दोन फूट खाली असावेत. 
- धोंडिराम सायकर, व्यापारी

महापालिका अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वीच ही कामे करण्यास सांगितले होते. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी प्रशासनाकडे करणार आहे. शुक्रवारी (ता. २२) दिवसभरात सर्व पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली आहे. 
- अाश्‍विनी चिंचवडे, नगरसेविका, चिंचवडगाव

काही ठिकाणी पावसाळी गटार आणि भुयारी गटारे एकत्र आली आहेत. तसेच पाऊसही जास्त पडला. त्यामुळे पाणी साठले. दिवाळीनंतर चिंचवडगावात पावसाळी गटारांचे मोठे पाइप बसविण्यात येणार आहेत. 
- के. डी. दरोडे, सहायक आरोग्य अधिकारी, ब प्रभाग, महापालिका

Web Title: rain water shop loss