पिंपरी शहरात दिवसभर ऊन; सायंकाळी धो धो 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

शहर परिसरात शुक्रवारी (ता. 13) दिवसभर ऊन-सावलीचा खेळ रंगला. अधूनमधून वाऱ्याची मंद झुळूकही येत होती. त्यामुळे वातावरण आल्हाददायक वाटत होते. सायंकाळी मात्र ढग दाटून आले आणि पावसाला सुरवात झाली. 

पिंपरी (पुणे) : शहर परिसरात शुक्रवारी (ता. 13) दिवसभर ऊन-सावलीचा खेळ रंगला. अधूनमधून वाऱ्याची मंद झुळूकही येत होती. त्यामुळे वातावरण आल्हाददायक वाटत होते. सायंकाळी मात्र ढग दाटून आले आणि पावसाला सुरवात झाली. 

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावली होती. दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने रस्ते चिखलमय झाले होते. मंडळांनी उभारलेल्या मंडप परिसरातही पावसाचे पाणी साचल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता. मात्र, तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे सायंकाळी देखावे व सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत होती. गुरुवारी (ता. 12) विसर्जन मिरवणुकीदरम्यानही पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यात भिजण्याचा आनंद मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांनी घेतला. 

शुक्रवारी सकाळपासूनच ऊन-पावसाचा खेळ रंगू लागला. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. साडेपाचच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. अवघ्या काही मिनिटांत सखल भागांमध्ये पाणी साचले. परिणामी, छत्री व रेनकोट शिवाय घराबाहेर पडलेल्या नागरिकांची व दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. काहींनी झाडांखाली आसरा घेतला. पिंपरी कॅंपात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दुकानांचा आधार घ्यावा लागला.

पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौक ते मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन व आकुर्डीतील ग्रेडसेपटरमध्ये थांबून दुचाकीस्वारांनी पावसापासून बचाव केला. शाळा सुटण्याच्या वेळेसच पाऊस आल्याने विद्यार्थ्यांनाही भिजतच घर गाठावे लागले. सुमारे दोन तासानंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in pimpri chinchwad city