पुण्यात पावसाची संततधार, 38 मिमी नोंद; शुक्रवारपर्यंत पाऊस

rain
rain

पुणे : पुण्यात शनिवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस आज (रविवार) सकाळीही सुरुच असून, आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत पुण्यात 38 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवसांत कोकण, गोवा, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे सोमवारी (ता. 21) मतदान पावसातच करावे लागणार आहे. 

नैर्ऋत्य मोसमी राज्यातून माघारी गेल्याचे जाहीर झाल्यानंतरही शुक्रवारपासून राज्यात पाऊस सुरू झाला आहे. गेल्या 24 तासांत सावंतवाडी 100, देवगड 94, कोल्हापूर 178, सोलापूर 31, रत्नागिरी 11, पणजी 53, सांगली 7, अहमदनगर 8 मिमी पावसाची नोंद झाली होती. शनिवारी दिवसभरात राज्यात अनेक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे 11, कोल्हापूर 178, महाबळेश्वर 13, नाशिक 7, मुंबई, सांताक्रूझ 7, अलिबाग 6, औरंगाबाद 2, अकोला 5 मिमी पावसाची नोंद झाली होती. 

पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गडगडाट व विजांसह पावसाची शक्‍यता आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यांत 20 ते 23 ऑक्‍टोबर या कालावधीत जोरदार वारा, विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आज(ता. 20) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. 

पुण्यात जोरदार पाऊस 
पुण्यात शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाचा जोर रात्री वाढला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह उपनगरांत पावसाने पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. आज (रविवार) सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत होता. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर झाला. शहराच्या मध्यवस्तीतील पेठांसह खडकवासला, धायरी, आनंदनगर, हिंगणे, राजाराम पूल, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, वडगाव, लष्कर भाग, वानवडी, विमाननगर अशा उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तर, सिंहगड रस्ता परिसरात रस्त्यावर पाणी साठले होते. पावसामुळे शहरातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

शुक्रवारपर्यंत पडणार पाऊस 
आज (रविवारी) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर, सोमवारी मतदानाच्या दिवशी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मंगळवारी (ता. 22) देखील तशीच स्थिती असेल. त्यानंतर 23 ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत ढगाळ वातावरण राहून हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com