सुपे परिसरात पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान

जयराम सुपेकर 
Sunday, 20 September 2020

गेल्या दोन महिन्यात ज्या ज्या वेळी पाऊस झाला, त्या त्या वेळी पेरलेला व रोपांसाठी टाकलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली.

सुपे (ता.बारामती) : परिसरात शनिवारी (ता.१९) झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे कांदा, बाजरी, भाजीपाल्याचे नुकसान झाले. तर काही भागात ऊस लोळून नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कोरोनाचा ग्रामीण भागात सुरु असलेला धुमाकूळ त्यात हातातोंडाशी आलेली पीके गेल्याने शेतकरी वर्ग घाबरला आहे. नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारा कांदा पावसामुळे सपाट झाला. असे एकदा नाही तर गेल्या दोन महिन्यांपासून घडत आहे. कांद्याची रोपे टाकली आणि पावसाची संतत धार सुरू झाली. गेल्या दोन महिन्यात ज्या ज्या वेळी पाऊस झाला, त्या त्या वेळी पेरलेला व रोपांसाठी टाकलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली. घरचे बी होते ते संपले. म्हणून विकतचे बी आणून कांदा केला मात्र, पावसाने गेला. तेलही गेले अन् तूपही गेले हाती धुपाटणे आले, अशीच स्थिती शेतकऱ्यांची झाल्याची माहिती नारोळी, कोळोली येथील शेतकरी प्रल्हाद ढमे, वसंतराव काटे यांनी दिली.

पावसाने शनिवारी दुपारी व सायंकाळी सुपे व परिसर मेघगर्जनेसह झोडपून काढला. सुप्यातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. सुमारे अडीच-तीन तासात १२५ मिमी पाऊस बरसला. त्यामुळे शेतात पाणी साचून तळी निर्माण झाल्याने उभी पीके पाण्यात गेली. १०-१२ दिवसांपूर्वी दोन तासात ११५ मिमी पाऊस झाला होता.

पानसरेवाडीच्या शेरीपरिसरात कांद्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रवीण पानसरे यांनी दिली. त्यांचा दीड एकर कांदा व एक एकर कोथिंबिर पाण्यामध्ये गेली. दंडवाडी, खोपवाडी परिसरात कांदा, बाजरी व ऊस लोळून नुकसान झाल्याची माहिती हनुमंत चांदगुडे, गोरख चांदगुडे, संदीप चांदगुडे यांनी दिली. अतिवृष्टीमुळे काही भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.  

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains caused severe damage onions in supe area of ​​Baramati