मोफत विजेसाठी आवाज उठवू - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

सांगवी - पाणीपुरवठा योजनांना मोफत वीज, तसेच पाटबंधारे खात्याकडून मोफत पाणी मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठविणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सांगवी - पाणीपुरवठा योजनांना मोफत वीज, तसेच पाटबंधारे खात्याकडून मोफत पाणी मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठविणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

नीरावागज (ता. बारामती) येथील गावभेट कार्यक्रमादरम्यान सुळे यांना गावागावातील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी दिल्या. त्याबाबत बोलताना सुळे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत करतानाच सुळे यांनी त्याबाबत सरकारला योग्य नियोजन करणे जमले नसल्याचे स्पष्ट केले. सरकार हे लोकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करीत असून, पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करीत आहे. नीरव मोदींसारख्या देशाची लूट करणाऱ्या लोकांचा मात्र वीजपुरवठा सुरळीत राहतो. ही बीब सामान्य जनतेवर अन्यायकारक आहे.’’

बारामती तालुक्‍यातील गुणवडी, मळद, मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, खांडज आदी गावांना सुप्रिया सुळे यांनी गाव भेट दिली. या भेटी दरम्यान खासदार सुळे यांनी नीरा नदी परिसरातील कारखान्यांनी नदीप्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा बॅंकेचे संचालक मदनराव देवकाते, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, वनिता बनकर, अबोली भोसले, राहुल झारगड, सरपंच मीनाक्षी देवकाते, उपसरपंच शुभांगी बुरुंगले आदी उपस्थित होते. स्वागत गुलाबराव देवकाते यांनी केले. प्रास्ताविक मदनराव देवकाते यांनी केले. सरपंच मीनाक्षी देवकाते यांनी आभार  मानले.

Web Title: Raise the voice for free power says supriya sule