
Raj Thackeray: पाडवा मेळाव्यातील भाषणामुळं राज ठाकरे अडचणीत! पुण्यात तक्रार दाखल
वाकड : गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत शिवाजीपार्कवर मनसेचा पाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण पार पडलं. पण आता या भाषणामुळं राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Raj Thackeray in trouble due to speech in Padwa Melava Complaint filed in Pune)
सूत्रांच्या माहितीनुसार, गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी होत असून वाकड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाजीद रजाक सय्यद यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी काल मुंबईत भाषण केलं, या भाषणामुळं दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करा असं तक्रारीत नमूद केलं आहे.