युतीला शिवस्मारक करायचेच नाही: राज ठाकरे

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

फ़क्त मेट्रो करुन प्रश्न सुटणार नाही. टाउन प्लानिंग नसेल तर सगळे फसणार आहे. जेव्हा अशा प्रकारच्या घोषणा सरकार करते; तेव्हा मुळात या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी तेवढे पैसे सरकारकडे आहेत काय, याचा विचारही व्हावयास हवा

पुणे - युती सरकारला मुळात शिवस्मारक करायचेच नसल्याचे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) केली. याचबरोबर, या शिवस्मारकावर आत्ता प्रस्तावित असलेला खर्च जर राज्यातीलगड किल्ल्यांच्या डागडुजीवर केल्यास येणाऱ्या पिढ्यांस शिवरायांच्या कार्याची महती खऱ्या अर्थी कळेल, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

मनसेच्या पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील कार्यालयाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे यांनी विविध मुद्यांना स्पर्श केला. यामध्ये शिवस्मारकासहित नोटाबंदी, राममंदिर, मेट्रो अशा अनेक संवेदनशील राजकीय विषयांचा समावेश होता. 

राममंदिराच्या मुद्यावरुन राज यांनी भारतीय जनता पक्षास (भाजप) यावेळी लक्ष्य केले. "देशात रामंदिर न करता आता स्थानकांना नावे देण्यात येत आहेत; मात्र मूळ राममंदिराचे काय,' अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. शिवस्मारकाबरोबरच राज यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही टीका केली. नोटाबंदीचा निर्णय हा फसल्याचे (भाजप) नेत्यांच्या देहबोलीकडे पाहून कळून येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपच्या लोकांना घोषणांचीच फार हौस असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

राज म्हणाले - 
# 60 वर्षांनंतरही भाजपला उमेदवार सापडत नाहीत. मोदींच्या जिवावर; वा कॉंग्रेस राष्ट्रवादीमधील लोकांच्या जिवावर भाजपचा विजय मिळविला आहे. 52 साली जन्मलेल्या भाजप ला माणसे मिळत नाहीत म्हणून अन्य पक्षाच्या लोकांवर डोळा आहे      

# शिवस्मारकाच्या निव्वळ उद्घाटनाशिवाय यांना काहीच करायचे नाही. पुतळा करायला शिल्पकार लागतो. तो कोण आहे? त्याचा अनुभव काय आहे? 

#फ़क्त मेट्रो करुन प्रश्न सुटणार नाही. टाउन प्लानिंग नसेल तर सगळे फसणार आहे. जेव्हा अशा प्रकारच्या घोषणा सरकार करते; तेव्हा मुळात या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी तेवढे पैसे सरकारकडे आहेत काय, याचा विचारही व्हावयास हवा. 

Web Title: raj thackeray lashes out at Government