परांजपेंची कलाकृती ‘माइलस्टोन’ - मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

पुणे - ‘आजवर राजा परांजपे यांचे नाव सांगून अनेक जण मोठे झाले. माझेच नव्हे तर अनेक कलाकारांचे ते खऱ्या अर्थाने सर होते. त्यांची प्रत्येक कलाकृती ही तर ‘माइलस्टोन’ होती. म्हणून त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना अंगावर शहारा येत आहे,’’ अशा भावना अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केल्या.

राजा परांजपे प्रतिष्ठानचा ‘राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार’ महापौर मुक्ता टिळक आणि उद्योजक भारत देसडला यांच्या हस्ते जोशी यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर प्रवीण तरडे यांनी जोशी यांच्याशी संवाद साधला. यानिमित्ताने वाहतूक व्यवसायातून येऊन अभिनय क्षेत्रात उमटवलेली मुद्रा, वेगवेगळ्या नाटक- चित्रपटांत केलेल्या भूमिका, त्यासाठी घ्यावी लागलेली मेहनत इथपांसून नाट्य परिषदेचे अध्यक्षपद सांभाळताना झेलावी लागणारी टीका...अशी वाटचाल उलगडत गेली.

जोशी म्हणाले, ‘‘भरत नाट्य मंदिरातील रंगमंचावरच माझ्या अभिनयाची सुरवात झाली. या वास्तूत जादू आहे. ती तुम्हाला सतत पुढे ढकलते. काहीतरी चांगले करायला लावते, हे मला पावलोपावली जाणवायचे. कारण या वास्तूला अनेक दिग्गजांचा सहवास लाभला आहे. विद्यार्थी असतानाच अनेक दिग्गजांचा अभिनय पाहायला मी येथे यायचो.’’ महापालिका यापुढे वेगवेगळ्या संस्थांच्या दर्जेदार कार्यक्रमांच्या पाठीशी राहील, असे टिळक यांनी जाहीर केले.

शरद तळवलकर, राजा गोसावी असे काही जुने कलावंत प्रेक्षकांना अन्नदाते म्हणायची. ते खरेच आहे. तुम्ही आमचे अन्नदातेच आहात. कारण, तुमच्याच जिवावर आमची घरे चालतात.
- मोहन जोशी, अभिनेते

Web Title: raja paranjape jeevangaurav award event