...और वहाँ की गाते हैं !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

पुणे - ‘कलाकाराला कुठलाही धर्म नसतो. तो कलेचाच पुजारी असतो; पण दोन देशांत ज्या वेळी तणावाचे वातावरण असते, त्या वेळी ‘यहाँ की खाते हैं और वहाँ की गाते हैं’ अशा कलाकारांवर सरकारने बंदीच आणायला हवी,’’ अशा शब्दांत गायक पं. राजन-साजन मिश्रा यांनी पाकिस्तानी कलाकारांविरोधात बुधवारी ‘राग’ आळवला. दहशतवादाविरोधात जे बोलत नाहीत ते सच्चे कलाकार असूच शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

एका कार्यक्रमानिमित्ताने राजन-साजन मिश्रा पुण्यात आले आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ज्या देशात आपण पोट भरण्यासाठी जातो, त्या देशावर दहशतवादी हल्ले होत असतील, तर आपण काहीच बोलायचे नाही का, म्हणजे तुम्ही मानवतेच्या विरोधात आहात, असे नसेल तर सच्चा कलाकार या नात्याने दहशतवादाचा विरोध केलाच पाहिजे. जे करत नाहीत ते डरपोक कलाकार आहेत.’’

हिंसा ही कुठल्याही धर्माने सांगितलेली नाही. युद्ध, संघर्ष हे काही पर्याय असू शकत नाहीत. यात वाया जाणारा पैसा, शिक्षण, आरोग्य, उद्योगासाठी लावला तर खूप मोठी प्रगती होऊ शकेल, असेही राजन-साजन यांनी सांगितले. जे सूडबुद्धीने आपल्या देशावर हल्ले करत आहेत, त्यांना मानवतेची सेवा करण्याची सद्‌बुद्धी मिळावी, अशीच आमची प्रार्थना असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा
तालायन म्युझिक सर्कलतर्फे बनारस घराण्याचे गायक पं. साजन मिश्रा यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यात गायिका डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे यांचे गायन होईल. त्यानंतर मिश्रा यांचा नृत्यगुरू पं. बिरजू महाराज यांच्या हस्ते सत्कार होईल. बिरजू महाराज यांच्या नृत्याविष्काराने या सोहळ्याचा समारोप होईल. बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार असून, तो सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ‘तालायन’चे संस्थापक अरविंदकुमार आझाद यांनी दिली.

‘बॉलिवूड म्युझिक’समोर शास्त्रीय संगीताला दुय्यम मानले जात आहे. हे आपले खूप मोठे दुर्दैव आहे. मात्र संगीतात येणारी नवी पिढी ‘टॅलेंटेड’ आहे. ती शास्त्रीय संगीताला वर घेऊन जाईल.
- पं. साजन मिश्रा, गायक

Web Title: rajan-sajan mishra reporter conferance