राजगडावरील दरीत अडकलेल्याची सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - "देव तारी त्याला कोण मारी' असे म्हणतात. असाच काहीसा अनुभव रविवारी हिंजवडी येथील एका तरुणाला आला. सुटी असल्यामुळे राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पाच जणांमधील एक जण रस्ता चुकला आणि खोल दरीत जाऊन अडकून पडला. मोबाईलवरून मित्रांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी गडावर धाव घेतली. गडावर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासाठी पुण्याहून आलेली मंडळी मदतीला धावली. त्यांनी धाडस दाखवत अडकून पडलेल्या तरुणाचा जीव वाचविला.

राजगडावर येणाऱ्या पर्यटकांना जेवण देणारी काही कुटुंबे आहेत. या कुटुंबातील मुलांना दरवर्षी पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप केले जाते. त्या विद्यार्थ्यांची यादी घेण्यासाठी आज प्रतिष्ठानचे महेंद्र धावडे, बापू झुरंगे आणि प्राची झुरंगे हे गडावर गेले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चार मुले त्यांच्याकडे आली. आमचा मित्र राकेश गवारे हा दरीत अडकला आहे. तो कुठे अडकला, हे माहीत नाही, मदत हवी आहे, अशी विनंती त्यांनी धावडे आणि झुरंगे यांना केली. गावकऱ्याला मदतीला घेऊन त्यांनी राकेशच्या मित्रांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. राकेशला आपण कुठे अडकलो आहोत, हेदेखील सांगता येत नव्हते. चार तासांच्या शोधानंतर आवाजाच्या दिशेने गेल्यावर राकेश दरीत एका ठिकाणी अडकून पडला असल्याचे त्यांना दिसून आले. तेव्हा धावडे आणि त्यांच्या मित्रांनी दोराच्या साहाय्याने दरीत उतरून राकेशला बाहेर काढले. तेव्हा राकेशसह त्यांच्या मित्रांचा जीव भांड्यात पडला.

Web Title: rajgad vally