नवजात अतिदक्षता विभाग बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

येरवडा - पर्णकुटी चौकातील पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात चक्क पावसाचे पाणी गळत आहे. आरोग्य विभागाने गेली कित्येक वर्षे रुग्णालयाची देखभाल व दुरुस्ती केलीच नाही. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी काही कोटी रुपये खर्च करून सुरू केलेला नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली आहे. 

येरवडा - पर्णकुटी चौकातील पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात चक्क पावसाचे पाणी गळत आहे. आरोग्य विभागाने गेली कित्येक वर्षे रुग्णालयाची देखभाल व दुरुस्ती केलीच नाही. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी काही कोटी रुपये खर्च करून सुरू केलेला नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली आहे. 

पंधरा वर्षांपूर्वी महापालिकेने तब्बल पंचवीस कोटी रुपये खर्च करून राजीव गांधी रुग्णालय बांधले. गेली दहा ते बारा वर्षे रुग्णालयात केवळ प्रसूति विभाग, बालकांचे लसीकरण व बाह्यरुग्ण विभाग सुरू होते. तीन महिन्यांपूर्वी सामाजिक उत्तरदायित्त्वअंतर्गत (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉस्निब्लीटी) काही कोटी रुपये खर्च करून रुग्णालयात नवजात बालकांचे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले. मात्र महापालिकेने रुग्णालयाच्या इमारतीकडे गेली अनेक वर्षे देखभाल व दुरुस्तीकडे लक्षच न दिल्यामुळे या वर्षी पावसाळ्यात अनेक विभागांत पावसाचे पाणी गळायला लागले. 

पाणीगळतीमुळे अनेक ठिकाणी स्लॅबला तडे गेले आहेत. टेरेसवर ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्‍या फुटल्या आहेत; तर काही ठिकाणी टेरेसवरील स्लॅब उखडल्यामुळे पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याचे पाहणीत दिसून आले. या वेळी टेरेसवर व सांडपाणी व जलवाहिन्यांजवळ मोठ्या प्रमाणात पिंपळ आणि वडाची झाडे वाढल्याने झाडांच्या मुळांमुळे काही ठिकाणी भिंतींना व स्लॅबला तडे गेले आहे.

राजीव गांधी रुग्णालयात लवकरच डायलिसिस व नेत्ररोग विभाग सुरू होणार होते. मात्र, रुग्णालयात पावसाचे पाणी गळत असल्यामुळे हे विभाग सुरू करण्यासाठी विलंब होणार असल्याचे सांगण्यात आले. 

महापालिकेच्या भवन विभागाकडून रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. इमारतीच्या टेरेसवर वॉटरप्रूफिंग करण्यात येत आहे. भिंतीवर वाढलेली वडाची व पिंपळाची झाडे काढण्यात येणार आहेत. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

महापालिकेने राजीव गांधी रुग्णालय ससूनच्या धर्तीवर चालविले पाहिजे. वडगावशेरी मतदार संघात एकमेव मोठे रुग्णालय आहे. त्यामुळे येथील गरीब व गरजूंना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्‍यक आहे. 
- युवराज बनसोडे, सिद्धार्थनगर, धानोरी

Web Title: Rajiv gandhi Hospital New Born Intensive Care Unit Close