व्हॅलेंटाइन डेला "तेजस', "सुबी'चे दर्शन होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात "तेजस' आणि "सुबी' ही आशियाई सिंहाची जोडी दाखल झाली असून, "व्हॅलेंटाइन डे'ला म्हणजे, येत्या 14 फेब्रुवारीपासून ही जोडी पुणेकरांच्या दर्शनास उपलब्ध होईल. तसेच, प्राणीप्रेमींना या जोडीला एक दिवसांपासून ते एका महिन्यांसाठी दत्तक घेता येणार आहे.

पुणे - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात "तेजस' आणि "सुबी' ही आशियाई सिंहाची जोडी दाखल झाली असून, "व्हॅलेंटाइन डे'ला म्हणजे, येत्या 14 फेब्रुवारीपासून ही जोडी पुणेकरांच्या दर्शनास उपलब्ध होईल. तसेच, प्राणीप्रेमींना या जोडीला एक दिवसांपासून ते एका महिन्यांसाठी दत्तक घेता येणार आहे.

प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंहाची जोडी आणण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यासाठी गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयाकडे तीन वर्षे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार 25 डिसेंबरला सिंहाची ही जोडी पुण्यात आणण्यात आली. मात्र, प्रवासादरम्यान त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून, प्रवासामुळे सध्या त्यांना पशुवैद्यकीय चिकित्सकांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. दोन्ही सिंह सहा वर्षांचे आहेत. सिंहासाठी खंदक उभारणीची प्रक्रिया सुरू झाली असून, सुरवातीला वाघांच्या दोन खंदकांपैकी पांढऱ्या वाघांच्या खंदकामध्ये त्यांना ठेवण्याची सोय केली आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आणि संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी मंगळवारी दिली.

जगताप म्हणाले, ""प्राणिसंग्रहालयाचा आगामी वीस वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी 18 लाख पर्यटक भेट देतात. वर्षाकाठी त्यांची संख्या वाढत आहे. प्रवेश शुल्कातून साडेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते आहे.''

वाघ आणि सिंहाला सर्वाधिक मागणी
वन्यप्राण्यांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दत्तक प्राणी योजनेला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवसासह विविध औचित्य शोधून नागरिक वाघ, बिबट्या, हत्तींसह इतर लहान प्राण्यांना दत्तक घेत आहेत. त्यात वाघ आणि सिंहाला सर्वाधिक मागणी आहे. या योजनेतून गेल्या पाच वर्षांत 27 लाख रुपये निधी मिळाला आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

Web Title: Rajiv Gandhi Zoo