खंदकात पहिल्यांदाच बछड्यांची झलक

कात्रज - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यांपूर्वी जन्मलेले चार बछडे आईसमवेत खंदकात मनसोक्त विहार करताना.
कात्रज - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यांपूर्वी जन्मलेले चार बछडे आईसमवेत खंदकात मनसोक्त विहार करताना.

कात्रज - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चार बछड्यांना सुदृढ आणि सक्षम झाल्यानंतर मनसोक्त विहार करण्यासाठी खंदकात सोडण्यात आले. वाघीण रिद्धीसोबत खंदकात बागडताना तिच्या चार बछड्यांच्या करामती कॅमेऱ्यात टिपण्याची संधी पर्यटकांनी आज साधली.

रिद्धी आणि बघीराम या पिवळ्या पट्टेरी वाघांच्या जोडीपासून २३ ऑक्‍टोबरला चार बछड्यांचा जन्म झाला. दोन महिन्यांपूर्वी या बछड्यांचा आकाश, गुरू, सार्थक आणि पौर्णिमा असा नामकरण सोहळा महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत पार पडला होता. सहा महिन्यांनंतर सरासरी तीस किलो वजनाच्या धष्टपुष्ट बछड्यांना मनसोक्त विहाराची गरज होती.

पर्यटकही सहा महिन्यांपासून बछड्यांची झलक पाहण्याच्या प्रतीक्षेत होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उत्तरेकडील खंदकाचा दरवाजा उघडण्यात आला. रिद्धी वाघीण सवयीप्रमाणे खंदकात आली. काही मिनिटांनी आकाश आणि गुरू खंदकात आले. कानोसा घेऊन सार्थक आणि पौर्णिमाही आले. या वेळी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, उपसंचालक डॉ. नवनाथ निघोठ उपस्थित होते. जाधव म्हणाले, ‘रिद्धी ही उत्तम व्याघ्रमातेचे उदाहरण आहे. गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंतचा अवघड कालावधी नैसर्गिकपणे पार पाडण्यासाठी तिचा सकारात्मक प्रतिसाद मोलाचा ठरला. प्रसूतीनंतर चार बछड्यांची काळजी घेत त्यांना जीव लावणाऱ्या रिध्दीने नव्याने खंदकात उतरलेल्या आपल्या बछड्यांना विहाराचे शिक्षण दिले. पाण्याच्या खोलीचा अंदाज घेणे, खंदकाच्या उंच सखल भागात विहार करताना घेण्याची दक्षता आदी प्रशिक्षण पहिल्याच दिवशी पहिल्याच तासात रिद्धीने आपल्या बछड्यांना दिले. विश्रांतीसाठीची जागा प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सज्ज ठेवली होती. नेमक्‍या त्याच जागेवर रिद्धी आणि चार बछडे विसावले आणि खंदक प्रवेशाचा पहिला दिवस यशस्वी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com