काश्मीरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राजू शेट्टी यांनी पुसले अश्रू 

raju shetty (2).jpg
raju shetty (2).jpg

पुणे : ''आसमानी संकटात सुलतानी कारभारामुळे जम्मू काश्मीरमधील शेतकरी पिचलेला आहे, आमच्यासाठी सरकार काहीच करत नाही या नैराश्याने शेतकरी ग्रासले आहेत. कलम ३७० हटविल्याने सफरचंद, अक्रोड, केसर बाजारात न गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या समस्यांनी पिचलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसण्याचा प्रयत्न माजी खासदार, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. तेथील शेतकरी संघटनांना मुख्य प्रवाहात आणून शेतीच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच ही नैसर्गीक आपत्तीने नुकसान झाल्याने कर्ज माफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी, स्वराज्य इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्या शिष्टमंडळाने जम्मू काश्मीरमधील 'कलम ३७०' हटविल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था समजून घेण्यासाठी दौरा केला. याबद्दल राजू शेट्टी यांनी महावीर जैन विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात माहिती दिली. यावेळी संयोजक युवराज शहा, संजय नहार यावेळी उपस्थित होते. 

राजू शेट्टी म्हणाले, 'कलम ३७०' हटविल्यानंतर आजही तेथे संचारबंदी सदृश स्थिती आहे. यावर्षी तेथे सफरचंदासह केसर, अक्रुड याचे चांगले उत्पादन झाले, पण कलम ३७० हटविल्यानंतर तेथील संदेशवहन व दळणवळणाची सुविधा बंद झाली. शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेता न आल्याने मोठे नुकसान झाले. नाफेडने सफरचंद खरेदीत लक्ष घातले होते. आपल्याकडे नाफेडने तूर, कांदा खरेदीत जसा सत्यानाश केला, तसाच घोळ तेथेही घातला. सफरचंदाचे दर नाफेडने पाडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जम्मू काश्मीरमध्ये १६ ते १७ लाख टन सफरचंदाचे उत्पादन झाले होते, पण नाफेडने केवळ दीड लाख टन सफरचंद खरेदी केले. 
तसेच बर्फाच्या वादळाने सफरचंद व केसरचे मोठे नुकसान झाले, पण अद्याप ही तेथे पंचनामे झालेले नाहीत. याविरोधात तेथे कोणी आवाजात ही उठवत नसल्याचेही समोर आले. 

आमच्याकडे कोणी बघणारे नाही त्यामुळे तेथील शेतकरी 
नैराश्यात आहेत. केवळ २ ते ३ टक्के शेतकरी निर्यात करातात. त्यामुळे तेथील तरुण शेतकरी एकत्र येऊन त्यांनी कृषी उद्योग उभारणी करावी, मुख्य प्रवाहात आल्यास यातून मार्ग काढता येऊ शकतो. तुम्ही आमच्याशी फटकून वागण्यीची गरज नाही, असा विश्वास तेथील शेतकऱ्यांना दिला. त्यावर काश्मीर मधील २७० संघटनांपैकी २० ते २५ संघटना आमच्या सोबत काम करण्यासाठी तयार झाल्या आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.

नाराजी आहे पण दिल हिंदुस्तानीच 
केंद्र सरकारने 'कलम ३७०' हटविल्याने आनंद आहे पण हा निर्णय विश्वासात न घेता केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आजही काही भागात स्वयंघोषित संचारबंदी आहे, सैनिकांच्याही काही चुका आहेत. यावर तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचे आहे का असे विचारले त्यावर शेतकऱ्यांनी आम्हाला भारतातच रहायचे आहे, आम्ही आनंदी आहोत असे सांगितलेच. शिवाय काश्मीर मधील नेत्यांना नजरकैदेत टाकल्याने  हे सरकारने चांगलेच केले अशीही भावना व्यक्त केली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com