घरात ढेकूण झाले म्हणून घरच जाळत नाहीत : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार आहे, तर तो बाहेर काढले पाहिजे, त्या बाजार समितीत्यांच्या कारभारात सुधारणा करावी. बाजार समिती बंद केली तर, शेतकऱ्यांनी जायचे कुठे, त्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.

पुणे : केंद्र सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पाडून शहरांमधील मोक्‍याचे भूखंड गिळंकृत करण्यावर डोळा असल्याचा संशय येत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, बाजार समित्यांमध्ये भ्रष्ट्राचार आहे, म्हणून त्या बंद केल्या जात असतील तर घरात ढेकुण झाले म्हणून आपण घरच जाळून टाकत नाहीत, अशा शब्दात या निर्णयावर टीका केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात राजू शेट्टी बोलत होते. संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार आहे, तर तो बाहेर काढले पाहिजे, त्या बाजार समितीत्यांच्या कारभारात सुधारणा करावी. बाजार समिती बंद केली तर, शेतकऱ्यांनी जायचे कुठे, त्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिहेक्‍टरी 10 हजार रुपयांची मदत जाहीर केलेली होती. केंद्राकडून मदत मिळावी यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. असे असतानाही राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी या सरकारने घेतलेल्या निर्णयाला फाटा मारून 8 हजार रुपयांची घोषणा केली. हे असा निर्णय कसे काय घेऊ शकतात? असा प्रश्‍न शेट्टी यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी त्यांच्या जम्मू कश्‍मीर दौऱ्यात शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था, सरकारचे धोरण, कलम 370 हटविल्यानंतर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व भारताबाबतची भूमिका याचीही माहिती शेट्टी यांनी दिली.

महाशिवआघाडीचे ठरू द्या मग आमचे ठरवू
आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये आहोत. राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची 'महाशिवआघाडी' तयार केली आहे. त्यांचा 'किमान समान कार्यक्रम' काय ठरतो ते पाहू. नंतर त्यांच्यासोबत जायचे की नाही यावर निर्णय घेऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju shetty Criticise central Government for Agricultural Income Market Committee