भाकरी फिरवता फिरवता "तवा'च गायब - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-शिवसेनेसोबत युती करून भाकरी फिरविण्याचा विचार केला. परंतु, भाकरी फिरवता-फिरवता आमचा "तवा'च गायब झाला, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावला. आम्ही सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर राखून आहोत. निवडणुकीबाबत स्वाभिमानी पक्षाची भूमिका अद्याप ठरलेली नाही. परंतु, यापुढे "तवा' शाबूत ठेवूनच भाकरी फिरवू, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षासोबत युती करणार, या प्रश्‍नाला उत्तर देताना शेट्टी बोलत होते. सदाभाऊ हे शेट्टी यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जात असत. निवडणुकीनंतर स्वाभिमानीचे खोत यांना कृषी राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. परंतु, काही महिन्यांतच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.

खोत यांनी दूध संघाच्या कारभारावर नुकतीच टीका केली होती. दूध उत्पादकांना योग्य भाव न दिल्यास गुजरात येथील अमूल संघाला दूध खरेदीसाठी परवानगी देऊ, असा इशारा दिला होता. त्यावर शेट्टी म्हणाले, 'शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. तो अमूल दूध संघाने द्यावा की अन्य कोणी द्यावा, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. दूध संस्थांनी हे करावे, ते करावे, असा सल्ला देण्याची गरज नाही. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, माळावर बोंब मारायला पाटलाची काही परवानगी घ्यावी लागत नाही. ती कोणीही मारू शकतं. अगोदर शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, सल्ला द्यायची गरज नाही, असेही शेट्टी यांनी सुनावले.

"सेल्फी वुईथ फार्मर'ची खिल्ली
राज्यमंत्री खोत यांनी "सेल्फी वुईथ फार्मर' हा उपक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर शेट्टी म्हणाले, 'सेल्फी अवश्‍य घ्या. परंतु, बांधावरून परत येताना गाल चोळत या. शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत, हे समजेल.''

साखर संकुलवर मोर्चा
ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्‍कम द्यावी. तसेच, दूध उत्पादकांच्या प्रश्‍नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या 29 जून रोजी पुणे येथील साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: raju shetty sadabhau khot politics