मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नाही - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - उसाची थकीत देणी आणि दूधदराच्या प्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 29 जून रोजी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत तेथून हटणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत दिला.

पुणे - उसाची थकीत देणी आणि दूधदराच्या प्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 29 जून रोजी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत तेथून हटणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत दिला.

शेट्टी म्हणाले, की खरीप तोंडावर आला असताना, उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. उसाची सुमारे दोन हजार कोटींची देणी कारखान्यांकडे थकीत आहेत. ऊस तुटल्यानंतर चौदाव्या दिवशी पैसे देणे कायद्याने बंधनकारक आहे. उशीर झाल्यास या अवधीसाठी ही रक्कम 15 टक्के व्याजदराने देणे बंधनकारक आहे. साखरेचे दर पडल्यामुळे आम्ही संयम बाळगला. आता साखरेचे दर 30 रुपयांपर्यंत स्थिर झाल्यामुळे कारखान्यांनी देणी तातडीने द्यावीत. अन्यथा साखर आयुक्तांनी कारखान्यांची मालमत्ता जप्त करून, शेतकऱ्यांची देणी द्यावीत.

'दूध पावडरबाबत राज्य आणि केंद्राच्या नियोजनाअभावी दुधाचे दर पडलेले आहेत. गाईच्या दुधाचा प्रतिलिटरचा उत्पादन खर्च 35 रुपये असताना, खरेदी मात्र 20 रुपयांनी होत आहे. हा तोटा किती दिवस सहन करायचा, असा प्रश्‍न आहे. दूधदरावर तातडीने उपाययोजना म्हणून सरकारने 25 लाख टन दूध पावडर खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करावा. शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सहा महिने थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावेत. त्यासाठी नऊशे कोटी रुपयांची तरतूद करावी, तसेच या प्रश्‍नावर धोरणात्मक निर्णय घ्यावा,'' अशी मागणी त्यांनी केली.

नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादन खर्च 25 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. मोडका-तोडका हमीभावदेखील देऊ न शकणारे मोदी सरकार 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे काय दुप्पट करणार? शेतकरी संवाद म्हणजे भंपकपणा आहे.
- राजू शेट्टी, खासदार

Web Title: raju shetty sugar Commissionerate rally