राजुरी वनविभागाने केला बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

आळेफाटा : राजुरी (ता. जुन्नर) येथे लवणमळा (खालचे लवण) परिसरात आज (ता.4) पहाटेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पूर्ण वाढ झालेला सुमारे 10 वर्षे वयाचा एक नर बिबट्या जेरबंद झाला. 

आळेफाटा : राजुरी (ता. जुन्नर) येथे लवणमळा (खालचे लवण) परिसरात आज (ता.4) पहाटेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पूर्ण वाढ झालेला सुमारे 10 वर्षे वयाचा एक नर बिबट्या जेरबंद झाला. 

राजुरी येथे लवणमळा (खालचे लवण) परिसरात मंगळवारी (ता.3) दुपारी काही ग्रामस्थांना उसाच्या एका शेताजवळ बिबट्या वावरताना प्रत्यक्ष दिसल्याने, ग्रामस्थांच्या वतीने जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी व उपसरपंच चंद्रकांत जाधव यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी लवणमळा परिसरात पिंजरा लावण्यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा केला. मंगळवारी (ता.3) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वनरक्षक जे. बी. सानप यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी बाळासाहेब म्हाताजी औटी यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. यावेळी पिंजऱ्यात बिबट्याची आमिष म्हणून शेळी ठेवण्यात आली होती. दरम्यान आज (ता.4) पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीच्या आवाजामुळे बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

वनविभागाचे वनरक्षक सानप व तांगडवार यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास राजुरीचे सरपंच संजय गवळी, उपसरपंच चंद्रकांत जाधव, राजेंद्र औटी, शरद औटी, बाळाजी औटी, संदीप औटी, अर्जुन डौले, उमेश औटी आदींसह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवले.

दरम्यान याबाबत माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, हा पूर्ण वाढ झालेला सुमारे दहा वर्षे वयाचा नर बिबट्या असून, त्यास कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  गेल्या काही दिवसांपासून येथील जाधववस्ती, डवलेमळा, नायकोडीवस्ती परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थानकडून सांगण्यात येत होते. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावूनही बिबट्या त्यात अडकत नव्हता.

या अगोदरही आजूबाजूच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. येथून जवळच असलेल्या गुंजाळवाडी येथील खराडीमळा परिसरात शिवाजी मनाजी बोरचटे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या 2 शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या. तसेच कोंबरवाडी परिसरात एका बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले होते.  परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Web Title: Rajuri forest department carried out leopards