मोर्चांतून जाती-धर्मांत फूट नको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘मराठा क्रांती मोर्चा किंवा बहुजनांच्या मोर्चांनी लोकशाही पद्धतीने, अहिंसा व बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. हे मोर्चे एकमेकांच्या विरोधात नाहीत. मराठा, बहुजन व मुस्लिम यांच्या एकत्रीकरणातूनच समाजाचा विकास आणि जातीअंताची लढाई लढता येईल. मात्र या मोर्चांचा वापर करत जाती-धर्मात फूट पाडून कोणाकडून राजकीय स्वार्थ साधला जायला नको,’’ असा सूर फुले-आंबेडकर 
व्याख्यानमालेत उमटला. 

महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानतर्फे फुले वाड्यात ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यात ‘मोर्चे, प्रतिमोर्चे आणि जातीअंत’ या विषयावर ‘साम वाहिनी’चे संपादक संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान आयोजित केले होते. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, दलित व आदिवासींच्या हक्कांसाठी कार्य करणारे डॉ. संजय दाभाडे उपस्थित होते. 
आवटे म्हणाले, ‘‘जातीच्या पायावर संघटना निर्माण होऊन त्या प्रभावी होणे धोक्‍याचे आहे. आपल्या मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चांना कोणाचाच विरोध असू नये. परंतु आपल्या महापुरुषांचा वैचारिक वारसा घेऊन जाणाऱ्यांकडूनच जातीय ध्रुवीकरण होऊ लागले, तर नक्कीच गफलत होईल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेकांशी नाते असून तीच महाराष्ट्राची परंपरा आहे.’’ 

गायकवाड म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याच्या गैरवापर थांबविण्यासाठी उपाययोजना व्हावी, अशा मागण्या आम्ही सरकारपुढे मांडल्या आहेत. बहुजन मोर्चांना आमचा विरोध नाही, तर पाठिंबाच आहे. भविष्यात मराठा, मुस्लिम व बहुजनांनी एकत्र येऊन ‘जाती जोडो’ आंदोलन केले पाहिजे.’’ डॉ. दाभाडे म्हणाले, ‘‘अस्मितेच्या राजकारणापोटी शोषित, दलित व आदिवासींना ‘सॉफ्ट टार्गेट’ केले गेले. कोपर्डीच्या घटनेशी संबंध नसतानाही ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मराठा मोर्चा मूक असला, तरी त्यामागील वातावरण वेगळे होते. भविष्यात जातीय अस्मिता परवडणाऱ्या नाहीत.’’ प्रास्ताविक हनुमंत पवार यांनी केले. नितीन पवार यांनी 
आभार मानले.

Web Title: rally are not religions-feet