गडकरींचा आता नवीन पुतळा आकाराला येणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा मुठा नदीच्या पात्रात सापडला असला, तरी आता नवीनच पुतळा तयार करून तो संभाजी उद्यानात बसवला जाणार आहे. त्यासाठी महापालिका सध्या लवकरात लवकर पुतळा तयार करून देणाऱ्या शिल्पकराचा शोध घेत आहे. 

पुणे - नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा मुठा नदीच्या पात्रात सापडला असला, तरी आता नवीनच पुतळा तयार करून तो संभाजी उद्यानात बसवला जाणार आहे. त्यासाठी महापालिका सध्या लवकरात लवकर पुतळा तयार करून देणाऱ्या शिल्पकराचा शोध घेत आहे. 

"राज संन्यास' या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे लेखन नाटककार राम गणेश गडकरी यांनी केले आहे, असा आरोप करत संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्यरात्री फोडला आणि तो मुठा नदीच्या पात्रात टाकून दिला. पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर हा पुतळा बुधवारी सापडला. हा पुतळा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. हातोड्याच्या आघातामुळे पुतळा काही भागात चिमटला आहे. त्यामुळे नवीनच पुतळा बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ""जो शिल्पकार लवकरात लवकर चांगला पुतळा तयार करून देईल, त्याला आम्ही राम गणेश गडकरींचा पुतळा बनवण्यास सांगणार आहोत. हे काम पूर्ण झाले, की तो लगेच बसवला जाईल; पण निवडणुकीच्या आधी की नंतर, हे आत्ताच सांगता येणार नाही. पुतळा बनवून कधी तयार होईल, यावर ते अवलंबून आहे.'' कलावंतांचे पुतळे एकत्र आणा, या मागणीसंदर्भात ते म्हणाले, ""साहित्य-नाट्य संस्थांकडून आलेली मागणी स्वागतार्ह आहे. याचा जरूर विचार केला जाईल आणि तशी पावलेही उचलली जातील.'' 

कलावंतांचे पुतळे एकत्र आणा 
नाटककार राम गणेश गडकरी यांच्याबरोबरच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, भास्करबुवा बखले, सवाई गंधर्व अशा अनेक मान्यवर लेखक-कलावंतांचे पुतळे शहरात ठिकठिकाणी आहेत. कलावंतांचे सर्व पुतळे पु. ल. देशपांडे उद्यानात आणून बसवावेत. प्रत्येक पुतळ्याच्या बाजूला त्या-त्या व्यक्तीचे जीवनकार्य फलकाच्या माध्यमातून लावावे. अशा उद्यानाला "वाङ्‌मयीन पर्यटनस्थळ' म्हणून पुढे आणावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, साहित्य परिषद, शाहीर परिषद आणि चित्रपट महामंडळातर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख आणि साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. कलावंतांचे पुतळे एकत्र असले, तर त्यांची सुरक्षा करणेही सोपे जाईल. त्यामुळे या मागणीचे पत्रही या संस्थांतर्फे पालिकेला देण्यात येणार आहे.

Web Title: ram gadkari new statue in sambhaji park