श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

पुणे - "श्रीराम जय राम जय जय राम'चा जयघोष...मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांच्या लागलेल्या रांगा... कीर्तन, पाळणा आणि त्यानंतर मिरवणूक... अशा भक्तिपूर्ण वातावरणात मंगळवारी (ता.4) शहरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. रामजन्म संगीत सोहळा, शोभा यात्रा, सामुदायिक रामरक्षा पठण अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचेही श्रीराम जन्म सोहळ्यानिमित्त आयोजन करण्यात आले होते. 

या सोहळ्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून राम मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेचे धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी सहा वाजता राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात कीर्तन व श्रीराम गीतांच्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. तुळशीबागेतील श्रीराम मंदिर, रहाळकर राम मंदिर, नारायण पेठेतील भाजीराम मंदिर, शनिवार पेठेतील जोशी राम, नाना पेठेतील श्रीराम मंदिर, मंदिरासह मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बहुतांश ठिकाणी भाविक गाठी व दवणा वाहून मूर्तीचे दर्शन घेत होते. सुंठवडा, शिऱ्याच्या प्रसादासह बहुतांश ठिकाणी मंदिरांकडून महाप्रसादाचेही आयोजन केले होते. दर्शनानंतर भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला. 

तुळशीबागेतील श्रीराम संस्थानाच्या श्रीराम मंदिरात सकाळी सहा वाजता पवमान अभिषेक सुरू झाला. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. उत्तर दरवाजातून निघालेल्या मिरवणुकीचे रामेश्‍वर मंदिरामध्ये खासगीवाले यांनी पूजा केली. त्यानंतर दगडूशेठ दत्त मंदिरातील पूजेनंतर मिरवणूक मंदिरात दाखल झाली. साडेदहा वाजता मिलिंदबुवा पडळे यांचे कीर्तन झाले. दुपारी 12.40 मिनिटांनी मंदिराच्या गाभाऱ्यात गुलाल उधळून जन्म झाला. त्यानंतर उत्सव मूर्तीला पाळण्यात ठेवून सुवासिनींनी पाळणा गायल्यानंतर जन्मसोहळा झाला. त्यानंतर भाविकांना सुंठवडा व पागोट्याचा प्रसाद देण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांनीही या वेळी उपस्थिती लावली. या वेळी तुळशीबागवाले कुटुंबीय, मंदिराचे कार्यकारी विश्‍वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले व भरत तुळशीबागवालेही उपस्थित होते. 

Web Title: ram navami celebration