अमित शहांना 'तसे' म्हणायचे नसेल - रामदास आठवले

रविवार, 11 जून 2017

 'महात्मा गांधी हे चतुर बनिया होते' असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच केले होते. त्याबाबत अनभिज्ञ असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. 

पुणे: 'महात्मा गांधी हे चतुर बनिया होते' असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच केले होते. त्याबाबत अनभिज्ञ असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. 

"मी काही शहा यांचे असे वक्तव्य ऐकलेले नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार महात्मा गांधी यांचा आदर करणारेच आहे. मोदी ज्याअर्थी गांधी यांचा आदर करतात त्याअर्थी शहा त्यांचा अनादर करतील असे वाटत नाही. 'देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांचा सामना गांधी यांनी चतुराईने केलेला आहे,' अशा अर्थाने शहा यांनी उद्गार काढले असतील,'' या शब्दांत रामदास आठवले यांनी शहा यांची पाठराखण केली. 

घटनेला, आरक्षणाला धोका नाही 
"देशाची घटना बदलण्यात येणार असल्याची चर्चा केली जात आहे. दलितांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. सरकारच्या वतीने दलितांच्या आरक्षणाला कसलाही धोका नाही. आरक्षण रद्द होणार असल्याबाबत कॉंग्रेस पक्षाकडून खोडसाळ प्रचार केला जात आहे,'' असे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी दिले. 

... तर शरद पवार यांनी "एनडीए'मध्ये यावे 
आठवले म्हणाले, ""शरद पवार हे नरेंद्र मोदी यांचे चांगले मित्र आहेत. मराठी माणूस राष्ट्रपती पदावर गेल्यास आनंदच वाटेल. राष्ट्रपती व्हायचे असेल तर पवार यांनी नरेंद्र मोदी यांना भेटले पाहिजे. तसे ते दोघे नेहमी भेटत असतातच. म्हणजे पवार हे "अंदाज' घेत असतात. मोदी ठरवतील तो उमेदवार भाजप, संघाला मान्य असेल. एनडीएचा उमेदवार अजून ठरायचा आहे. तो ठरायच्या आत जर पवार "एनडीए'मध्ये आले तर त्यांच्या नावाचा विचार होईल. एनडीएची ताकद वाढल्यास आम्हाला आनंदच आहे. भाजपचाही प्रयत्न असाच आहे की एकाही राज्यात एनडीएच्या विरोधात कोणी शिल्लक राहू नये.'' 

बच्चू कडू हे काही बच्चा नाहीत

"बच्चू कडू हे काही 'बच्चा' नाहीत. दोन तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत आणि माझे मित्रही आहेत. 'मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बॉंब टाकू' हे त्यांचे विधान नक्षलवाद्यांसारखे आहे. ते लोकशाहीवादी नेते आहेत, नक्षलवादी नाहीत. पण आमदार असलेल्या व्यक्तीला असे वक्तव्य शोभणारे नाही,'' अशी टिप्पणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी केली.

पाकिस्तानला धडा शिकवाच 
""पाकिस्तानशी दुश्‍मनी घेण्याची भूमिका केंद्र सरकारची नाही, मात्र सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज आहे. पाक-व्याप्त काश्‍मीरलाही ताब्यात घेतले पाहिजे. जम्मू आणि संपूर्ण काश्‍मीरला आर्थिक विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. तिथल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देत दहशतवादी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. विराट कोहलीच्या टीमने जसे 124 रनांनी पाकिस्तानला हरविले तसे नरेंद्र मोदी यांचे सरकार पाकिस्तानला हरवेल,'' असा विश्‍वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

Web Title: ramdas athawale gives clean chit to amit shah on chatur baniya remark