वात्रटिकांना मिळाली सबनीस यांच्या वाणीची धार

पत्रकार भवन - रामदास फुटाणे यांना जिंदादिल पुरस्कार प्रदान करताना कीर्ती शिलेदार. या वेळी (डावीकडून) डॉ. शिरीष गांधी, प्रमोद आडकर, फुटाणे, शिलेदार, डॉ. श्रीपाल सबनीस आणि भारत देसडला.
पत्रकार भवन - रामदास फुटाणे यांना जिंदादिल पुरस्कार प्रदान करताना कीर्ती शिलेदार. या वेळी (डावीकडून) डॉ. शिरीष गांधी, प्रमोद आडकर, फुटाणे, शिलेदार, डॉ. श्रीपाल सबनीस आणि भारत देसडला.

पुणे - हिंदी काव्य, चित्रपट, राजकारण या विश्‍वात संचार करून वात्रटिकेवर स्थिरावलेले कवी रामदास फुटाणे यांच्या काव्याला डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वाणीची धार लाभली आणि त्यांच्या टीकेतील मार्मिक व्यंग एका साहित्यिकाच्या मुखातून ऐकण्याचा अनुभव गुरुवारी रसिकांनी घेतला.
‘रंगत संगत प्रतिष्ठान’ आणि ‘श्‍यामची आई फाउंडेशन’ या संस्थांनी फुटाणे यांचा जिंदादिल पुरस्कार देऊन गौरव केला. नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. डॉ. सबनीस, भारत देसडला, प्रमोद आडकर, डॉ. शिरीष गांधी या वेळी उपस्थित होते. फुटाणे यांचा सत्कार असल्याने त्यांच्या वात्रटिकेतून हास्याची लहर सभागृहात पसरेल, अशी अपेक्षा असताना त्यांनी आपल्या जडणघडणीबद्दल सांगितले. 

डॉ. सबनीस यांनी मात्र फुटाणे यांच्या वात्रटिका वाचून दाखविल्या आणि उपस्थितांना हसवत ठेवले. स्वत:ला काटेरी येड्याबाभळीची उपमा देत, हा सत्कार या बाभळीखाली होत आहे, असे त्यांनी म्हणताच सभागृहात जोरदार हशा उमटला. फुटाणे असो वा फ. मु. शिंदे, त्यांचे सामर्थ्य हे हास्य कवितेत नाही, तर प्रचंड सामाजिक भानाची प्रगल्भता त्यांच्या कवितेत आहे. पण विनोदावर स्वार झाल्याने असे कवी वाया गेले, असे मला वाटते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

फुटाणे यांच्या कवितेत हास्य असले, तरी परिस्थितीवरील गंभीर भाष्याचे मर्म त्यात आहे. राजकारणात राहूनही त्यांनी राजकारण्यांची तळी कधीच उचलली नाही. राजकारण्यांना लाजवेल, अशा भूमिका साहित्य, नाटक, चित्रपट क्षेत्रातील लोक घेत असतात; परंतु फुटाणे यांनी तसे केले नाही, तर या विकृतीला कवितेतून समाजासमोर आणले, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

दिग्गजांमुळे जडणघडण
माझ्या आयुष्याचा प्रवास वाकडातिकडा आणि अपयशाचा आहे. पण अनेक क्षेत्रांत नोंदी झाल्याने मला लोकांनी लक्षात ठेवले. दादा कोंडके यांनी मला चित्रपट क्षेत्र दाखविले. आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर, निळू फुले, श्रीराम लागू यांच्यासह असंख्य दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभला. त्यातून माझी जडणघडण झाली, असे सांगत फुटाणे यांनी जीवनप्रवास उलगडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com