रामदासी मोक्षपटाचा उलगडणार प्रवास

Manisha-Bathe
Manisha-Bathe

पुणे - पूर्वी मठांमध्ये आध्यात्मिक स्वयं-अध्ययनाची विविध तंत्रे विकसित करण्यासाठी मोक्षपट हा खेळ खेळला जायचा. सापशिडीसारखा हा आध्यात्मिक खेळ असून, यातून रामदासी व वारकरी संप्रदायांना जोडणारा सेतू समोर आला आहे.

रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट (एक तौलनिक मागोवा) या पुस्तकातून मोक्षपटावर प्रकाश टाकण्यात आला आहे. लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यामध्ये रामदासी व वारकरी संप्रदायाला जोडणारे संदर्भ आलेले आहेत. मनीषा बाठे यांनी हे संशोधन केले आहे.

मोक्षपटाच्या वरील पट्टीवर उजव्या बाजूस संत ज्ञानेश्‍वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि चांगदेव तर डाव्या बाजूस चंद्र, सूर्य, इंद्र व दोन ऋषी चित्र स्वरूपात आहेत. याविषयी बाठे म्हणाल्या, ‘‘संकेतचित्रांवरून समर्थ रामदासांचा संत ज्ञानेश्‍वर व वारकरी संप्रदायाप्रती असणारा आदरभाव दिसतो. रामदासी मोक्षपटात एकूण ३१० रकान्यांमधील २९४ संज्ञा श्रीमत दासबोध ग्रंथातील विषयांशी संलग्नआहेत. या ग्रंथात संज्ञांचे स्पष्टीकरण करताना समर्थांच्या अन्य स्फुटांचा, रचनांचा आधार घेतला आहे. रामदासी मोक्षपटात ३८ शिड्या व ५३ सर्प आहेत. यातून रामदासी संप्रदायाची स्थापना ही वारकरी परंपरेचा आदर बाळगून पूरक झाली असल्याचे जाणवते.’’ 

‘‘नगरचे संस्थानिक आबाजी पांडुरंगबुवा रामदासी झेंडेवाले यांनी १८६७ मध्ये त्यांच्या संग्रहातील मोक्षपट लोकोपयोगासाठी प्रथम प्रकाशित केला. ब्रिटिश सत्तेमुळे रामदासी मोक्षपटाच्या प्रचार-प्रसाराचा प्रयोग बारगळला.

मोक्षपटाची छापील अवशेष-प्रत साताऱ्याच्या अरुण उमराणी यांच्या सौजन्याने सध्या धुळ्यात मिळाली,’’ असे बाठे यांनी सांगितले. या ग्रंथाला संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. 

‘अनेक संशोधकांना वारकरी संप्रदायाचे फड आणि मठांत तुकोबांची जितकी हस्तलिखिते उपलब्ध होतात तितकीच रामदासी मठात उपलब्ध होत आहेत. समर्थोत्तरही समर्थ प्रशिष्य-मठपतींनी त्यांच्या अभंगांचे आवृत्तीकरण व संत तुकारामांची चरित्रेही लिहिल्याचे संशोधिले आहे,’ असा उल्लेख डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या तुकाराम दर्शन पुस्तकात केला आहे. 

काय आहे मोक्षपट?
सापशिडीमध्ये फासे टाकून सोंगट्या हलवल्या जातात, त्याप्रमाणे मोक्षपटात फासे टाकले जातात. फक्त यामध्ये एका माणसासाठी चार सोंगट्या असतात. जास्तीत जास्त आणि लवकर घरे पार केली तर मोक्ष मिळतो, अशी यामागील संकल्पना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com