...अन्यथा, ‘अब दिल्ली दूर नहीं’! 

रमेश डोईफोडे 
Sunday, 15 November 2020

‘कोरोना’चे प्रारंभीचे रौद्र स्वरूप पुणे परिसरात आता बऱ्यापैकी सौम्य झाले आहे. या जीवघेण्या विषाणूविरुद्धची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे, असे म्हणण्याइतपत त्याचा प्रभाव रोखण्यात येथे यश आले आहे.

‘कोरोना’वर पूर्ण मात करायची असेल, तर केवळ तात्कालिक यशावर समाधान मानून चालणार नाही. एखादा फटाका न फुटता विझला आहे, असे वाटावे आणि त्याचा अचानक स्फोट व्हावा, तसे या विषाणूबाबतही होऊ शकते. त्यामुळे पुण्यातील रुग्णसंख्या कमी झाली, म्हणून सुरक्षिततेच्या नियमांना तिलांजली दिल्यास त्याचा मोठा फटका शहराला बसण्याचा धोका आहे. 

‘कोरोना’चे प्रारंभीचे रौद्र स्वरूप पुणे परिसरात आता बऱ्यापैकी सौम्य झाले आहे. या जीवघेण्या विषाणूविरुद्धची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे, असे म्हणण्याइतपत त्याचा प्रभाव रोखण्यात येथे यश आले आहे. ‘हत्ती गेला, शेपूट राहिले’ अशी स्थिती आहे. मात्र, ‘कोरोना’चा शंभर टक्के निःपात होईपर्यंत गाफील राहून चालणार नाही. प्रत्यक्षात, सध्या दिवाळीनिमित्त बाजारहाट करण्यासाठी रस्त्यांवर, दुकानांत जी अनियंत्रित गर्दी उसळली आहे, ते पाहता आपण दूर जात असलेल्या अरिष्टाला पुन्हा जवळ करीत आहोत काय, याची काळजी सर्वसंबंधितांना वाटू लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तूर्त परिस्थिती नियंत्रणात 
सरकारी वा खासगी रुग्णालयांत बेड शिल्लक नाहीत, अधिकारी-पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधूनही याबाबत उपयोग होत नाही, वेळेत चांगले उपचार न मिळाल्याने रुग्ण जिवाला मुकत आहेत... ही भीषण परिस्थिती पुण्याने काही दिवसांपूर्वी अनुभवली आहे. त्यावेळी रोज हजाराच्या पटींत नवीन ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण निदर्शनास येत होते. सर्वांनाच रुग्णालयांत सामावून घेणे तेव्हा अशक्‍य असल्याने घरीच विलगीकरणात राहा, असा पर्याय असंख्य नागरिकांना द्यावा लागला होता. असुरक्षितता, अनिश्‍चितता यांचे सावट सगळीकडे पसरले होते. पदाधिकारी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सजग नागरिक या सगळ्यांच्या प्रयत्नांनी अखेर ही लाट रोखली गेली आणि परिस्थिती नियंत्रणात आली. 

नियम पाळणारे सुरक्षित 
‘कोरोना’ला थोपवायचे तर रोगप्रतिकारशक्ती चांगली हवीच; पण त्याचबरोबर ‘मास्कचा वापर, घराबाहेर इतरांपासून योग्य अंतरावर वावर आणि हाताची स्वच्छता’ ही त्रिसूत्रीही तेवढीच महत्त्वाची आहे. ज्यांनी ही ‘आयुधे’ वापरली, त्यांपैकी बव्हंशी लोक ही साथ आजवरच्या परमोच्च बिंदूवर असतानाही सुरक्षित राहिले. ‘आपल्याला काही होत नाही,’ असे समजून ज्यांनी कोणतेही निर्बंध न पाळता सगळीकडे मुक्त संचार केला, त्यांच्यावर पश्‍चात्तापाची वेळ आली. या ‘कोरोना’ लाटेत असे अनेक चढ-उतार अनुभवत सगळे जण आता नेहमीच्या दिनचर्येकडे वळण्याच्या मार्गावर आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त 
पुण्यात मध्यंतरी रोज चाळीस ते नव्वदपर्यंत ‘कोरोना’ मृतांची नोंद होत होती. तो आकडा अलीकडे दहाच्या आत आला आहे. आजही तीन-चारशे बाधित रोज सापडत असले, तरी या आजाराला यशस्वीपणे तोंड देऊन बरे होणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. कोणत्याही सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत सहजपणे उपचार उपलब्ध होत आहेत. ही परिस्थिती आणखी सुधारत गेली, तर ‘कोरोना’ पूर्णपणे संपुष्टात येईल किंवा एक सर्वसाधारण आजार म्हणून अस्तित्वात राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निर्बंधांबाबत ढिलाई 
सर्वसामान्य नागरिकांना या आजारासंदर्भात सुरवातीला वाटणारे भय आता उरलेले नाही. दिवाळीच्या निमित्ताने रस्त्यांवर जी तोबा गर्दी पाहायला मिळत आहे, हे त्याचेच निदर्शक आहे. चिंता गर्दीची नसून, तीत न पाळल्या जाणाऱ्या शिस्तीबद्दलची आहे. मुख्य विषय मास्कचा. तो ‘अजिबात न वापरणारे’ किंवा ‘योग्य प्रकारे न वापरणारे’ असे दोन्ही प्रकारचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यांवर दिसत आहे. या प्रमादाबद्दल पुणेकरांनी आतापर्यंत किमान सहा कोटी रुपयांचा दंड भरला आहे! ही बेफिकीर मंडळी सावरू पाहणाऱ्या शहराला पुन्हा संकटाच्या दिशेने नेतील की काय, अशी रास्त चिंता सर्व सूज्ञांना आहे. या संदर्भात दिल्लीचे उदाहरण डोळ्यांत अंजन घालणारे आहे. 

बेशिस्तीचा परिणाम 
देशभरात सगळीकडे लॉकडाउन अधिकाधिक शिथिल केला जात असताना, दिल्लीत मात्र तो पुन्हा कडकपणे अमलात आणावा, अशी मागणी होऊ लागली आहे. कारण ‘कोरोना’ तेथे पुन्हा वेगाने हातपाय पसरू लागला आहे. प्रदूषणाची चिंताजनक पातळी आणि आरोग्यविषयक सगळे नियम पायदळी तुडवून होत असलेले जनव्यवहार यांमुळे तेथील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. एकाच दिवशी सात हजारांहून अधिक नवीन बाधित सापडू लागले आहेत. त्या सगळ्यांना दाखल करून घेण्यासाठी तेथील रुग्णालयांत पुरेसे बेड नाहीत. ही वेळ स्थानिक नागरिकांनीच स्वतःवर ओढवून आणली आहे. शिस्त पाळली नाही, तर काय होऊ शकते, याचे हे ठळक उदाहरण आहे. हे सर्व पाहता, पुणेकरांना नेमके काय हवे आहे? आताची सावरत असलेली परिस्थिती आणखी सुधारायची की दिल्लीचा कित्ता गिरवायचा?.. आपण वेळीच सावध व्हायला हवे. अन्यथा, वेगळ्या अर्थाने ‘अब दिल्ली दूर नहीं’!... 

संवेदनशीलता जपण्याची गरज 
पुणेकर सात-आठ महिन्यांच्या संकटग्रस्त काळानंतर आता थोडा मोकळा श्‍वास घेऊ लागले आहेत. चिंतेला झुगारून दिवाळी जल्लोशात साजरी करण्याची इच्छा त्यांना आहे; पण आपण आनंदाचे दीप उजळवीत असताना, ‘कोरोना’ने जवळपासच्या अनेक घरांत अंधार निर्माण केला आहे; आपल्या उत्साही कृतीतून त्यांच्या भावना कळत-नकळत दुखावल्या जाणार नाहीत, याचीही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh doiphode write article about coronavirus