शहरात रमजान ईद उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

परदेशी विद्यार्थ्यांचा सहभाग
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विविध महाविद्यालयांतील परदेशी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे रमजान ईदचा गोडवा अनुभवला. आझम कॅम्पस परिवाराने पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे, अत्तर आणि मिठाई देऊन ईद साजरी केली. आखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्याने तेथील रीतीप्रमाणे पुण्यातील परदेशी विद्यार्थी ईद साजरी करतात. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते.

पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली.

मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले. यानिमित्त पुणे कॅंटोन्मेंट येथील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम नागरिकांनी सामुदायिक नमाज अदा केली. शहरातील मशिदींना विद्युतरोषणाई करण्यात आली होती. तसेच, अनेक घरांमध्येदेखील विद्युतरोषणाई केली होती. नागरिकांनी सकाळीच आपल्या जवळच्या मशिदींमध्ये नमाजपठणासाठी गर्दी केली होती. ईदगाह मैदानावर सकाळी दहाला सामुदायिक नमाजपठण झाले. या वेळी मौलाना अब्दुल रौफ, मौलाना तालीफ आणि मौलाना सईद यांनी जमात घेतली. नमाजपठणानंतर मुस्लिम नागरिकांनी एकमेकांना गुलाबपुष्प देऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या.

मैदानाजवळ राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, ईदगाह ट्रस्ट, महापालिका आणि पोलिस आयुक्त कार्यालय यांच्या वतीने ‘ईद मिलन’चा कार्यक्रम आयोजित केला होता. खासदार गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, विवेक यादव आणि ताहेर आसी या वेळी उपस्थित होते. मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, परिसरातील वाहतूक काही काळासाठी वळविण्यात आली होती. दिवसभर कौटुंबिक कार्यक्रम झाल्यानंतर नागरिकांनी संध्याकाळी लष्कर भागातील महात्मा गांधी रोड, ईस्ट स्ट्रीट, सेंटर स्ट्रीट, भीमपुरा गल्ली, साचापीर स्ट्रीट या भागात गर्दी केली होती. 

या भागातील हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरही रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली. भारतीय जनता पक्षासह अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी शहरातील विविध भागांतील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramjan Ied Celebration Namaj Pathan Muslim