पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्याला रॅम्पची ‘लिंक’

पीतांबर लोहार
बुधवार, 2 जानेवारी 2019

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गावरील एम्पायर इस्टेट पुलावरून (संत मदर तेरेसा उड्डाण पूल) पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावर उतरण्यासाठी यशोपुरम सोसायटीजवळ दोन्ही बाजूंना रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे चिंचवड व पिंपरी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे. 

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गावरील एम्पायर इस्टेट पुलावरून (संत मदर तेरेसा उड्डाण पूल) पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावर उतरण्यासाठी यशोपुरम सोसायटीजवळ दोन्ही बाजूंना रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे चिंचवड व पिंपरी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे. 

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटी मार्गावर एम्पायर इस्टेट येथे पूल उभारण्यात आला आहे. पुणे- मुंबई महामार्ग, पुणे- मुंबई लोहमार्ग, पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता आणि पवना नदी ओलांडून जाणारा हा पूल सुमारे पावणेदोन किलोमीटर लांबीचा आहे. पिंपरी एमआयडीसीतील ऑटोक्‍लस्टर नजीकच्या दोन कंपन्यांची जागा अद्याप मिळालेली नसल्याने बीआरटी बस सेवा सुरू झालेली नाही. मात्र हा पूल गेल्या वर्षी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. पुलावरून पुणे-मुंबई महामार्गाने पुण्याकडे जाण्यासाठी केलेला स्वतंत्र रॅम्पही खुला करण्यात आला आहे. महामार्गावरून पुलावर जाण्यासाठी आणि पुलावरून खाली उतरण्यासाठी दोन्ही बाजूंना रॅम्प उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र लिंक रस्त्यावरून पुलावर जाण्यासाठी किंवा पुलावरून लिंक रस्त्यावर येण्यासाठी रॅम्प उभारण्याकरिता जागेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. तसेच महामार्गावरून लिंक रस्त्यावर जाण्यासाठी लोहमार्गाखालून भुयारी मार्ग करण्यास एम्पायर इस्टेट सोसायटीतील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे लिंक रस्ता किंवा नव्याने उभारण्यात येणाऱ्या केशवनगर-चिंचवड ते सुभाषनगर-पिंपरी या नदी किनाऱ्याच्या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी पुलाचा काहीही उपयोग होणार नव्हता. मात्र आता स्थानिक जागा मालकांनी रॅम्प उभारण्यासाठी जागा देण्याची तयारी दर्शविल्याने रॅम्पचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 ...असे असतील रॅम्प
संत मदर तेरेसा उड्डाण पुलावरून पवना नदीच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना रॅम्प सुरू होईल. नव्याने उभारण्यात येणाऱ्या केशवनगर- चिंचवड ते पिंपरी लिंक रस्ता स्मशानभूमी रस्त्यावर संत गार्डन सोसायटीजवळ तो जोडला जाईल. त्यामुळे लिंक रस्त्यावर आणि नदी किनारी उभारण्यात येणाऱ्या  नवीन रस्त्यावर जाणे-येणे सोपे होईल. 

दोन्ही बाजूंस रॅम्प
१८० मीटर (प्रत्येकी) - लांबी
१० मीटर (प्रत्येकी) - रुंदी

आयुक्तांच्या आदेशानंतर कार्यवाही
संत मदर तेरेसा उड्डाण पुलावरून लिंक रस्त्यावर येण्यासाठीचे रॅम्प उभारण्यासाठी जागा देण्यास जागा मालकांची तयारी आहे. महापालिका आयुक्तांच्या अधिकाराखाली जमीन ताब्यात घेऊन त्यांच्या आदेशानुसार रॅम्पसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती स्थायी समिती सदस्य राजेंद्र गावडे यांनी दिली. 

Web Title: Ramp on Pimpri-Chinchwad link road