रामफळाची आवक सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - हृदयासारखा आकार...लालसर, हिरवट रंग... चवीला गोड असलेल्या रामफळाची सध्या बाजारात चांगली आवक होत आहे. सीताफळाचा हंगाम संपत आल्यानंतर या फळाची आवक सुरू होत असते.

पुणे - हृदयासारखा आकार...लालसर, हिरवट रंग... चवीला गोड असलेल्या रामफळाची सध्या बाजारात चांगली आवक होत आहे. सीताफळाचा हंगाम संपत आल्यानंतर या फळाची आवक सुरू होत असते.

मार्केट यार्ड येथील फळांच्या घाऊक बाजारात सध्या रामफळाची दीडशे ते पावणेदोनशे क्रेटस (प्रति २० किलो) इतकी आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, नगर, सोलापूर आदी ठिकाणांहून त्याची आवक होत आहे. सीताफळाच्या तुलनेत या फळाला मागणी कमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सीताफळाप्रमाणे या फळांची बागा तयार करून लागवड करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. रामफळाचे झाड हे सदाहरित या प्रकारात मोडते. साधारणपणे २६ ते ३० फूट एवढी उंची या झाडाची असते. या फळातून शरीराला ‘सी’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाण मिळते. कॅल्शियम, मॅंगेनीज, फॉस्फरस, पोटॅशियम ही पोषक द्रव्येही शरीराला मिळतात.  

सीताफळाचा हंगाम संपल्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून रामफळाची आवक सुरू होते. हा हंगाम मार्चपर्यंत चालतो. याबाबत व्यापारी विठ्ठल कटके म्हणाले, ‘‘रामफळ खाणारा एक वर्ग आहे. चवीला गोड आणि मोठ्या फळात गर जास्त असल्याने त्याला मागणी असते. सध्या तापमान वाढल्याने पिकलेली रामफळ भाव खाऊन जात आहेत. त्यांना प्रतिकिलो ४० ते ७० रुपये इतका भाव मिळाला. या फळाची बागात लागवड केली जात नाही. बांधावर, घरासमोर असलेल्या झाडाची फळे बाजारात विक्रीला पाठविली जातात. पुण्यातून गोवा, मुंबई या शहरात रामफळ विक्रीला पाठविली जातात. थेट शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाबरोबर व्यापारी मालाचाही यात समावेश असतो.’’

कर्करोग, हृदयरोगावर गुणकारी
रामफळ हे दक्षिण आफ्रिका, मध्य अमेरिका या भागातील देशांतही आढळते. दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, बांगलादेशातही त्याचे उत्पादन होते. कर्करोग, यकृत, हृदयरोग आदीवर ते गुणकारी असल्याचे सांगितले जाते. 

Web Title: ramphal in market