लांडग्यांच्या अधिवासावर माहितीपटातून प्रकाश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे - सासवड, जेजुरी, सुपे ते बारामती हा भाग पुण्यापासून जेमतेम शंभर किलोमीटर अंतरावर. अगदी तास-दोन तासांवर. दिसताना हा सगळा माळरान दिसत असला तरीही तेथे अधिवास आहे तो गवताळ प्रदेशातील प्राण्यांच्या नियंत्रकाची भूमिका बजावणाऱ्या वुल्फ अर्थात लांडग्यांचा; पण वाढते नागरीकरण, प्रस्तावित पुरंदर विमानतळ या सर्वांमुळे हा अधिवास धोक्‍यात येत असल्याचे "ट्रेझर्स ऑफ ग्रासलॅंड' या माहितीपटातून मांडले आहे.

पुण्यातील तरुण निसर्ग छायाचित्रकारांनी बनवलेला हा माहितीपट आहे. मिहीर गोडबोले व मकरंद डंबारे यांनी त्याची निर्मिती केली आहे. यात गवताळ प्रदेशातील वन्यजीवांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 2009 मध्ये सासवड येथे त्यांना लांडग्यांची एक टोळी दिसली. अनेक वर्षे या टोळीचे निरीक्षण आणि चित्रण केल्यावर या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

गोडबोले, डंबारे, विश्‍वतेज पवार, मिलिंद राऊत, विराज आपटे, सिद्धेश ब्राह्मणकर, प्रतीक जोशी, आश्विन वैद्य यांनी या लांडग्यांच्या टोळीचे निरीक्षण केले. त्यांना "वुल्फ गॅंग' म्हटले जाते.

याबद्दल पवार म्हणाले, 'या भागात रस्त्यांचा विकास होत आहे. काही वर्षांपूर्वी आम्हाला ज्या ठिकाणी सहजतेने लांडगे दिसत होते, तेथे आता मोठी बांधकामे सुरू आहेत. त्याचवेळी प्रस्तावित विमानतळही याच भागात आहे. या सर्वांमुळे लांडग्यांचा अधिवास धोक्‍यात येत आहे. अर्थात, विकास झाला पाहिजे. ती काळाची गरज आहे; पण त्यासाठी पर्यावरणाचा समतोल टिकवला पाहिजे.''

"एनव्हॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया', "नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्यातर्फे आयोजित "रानभूल' या वन्यजीव माहितीपट महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. गेले तीन दिवस वन्यजीवनाचे अंतरंग उलगडून दाखविणाऱ्या या महोत्सवाला निसर्गप्रेमी पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणे वनविभाग (वन्यजीव) यांचे विशेष साहाय्य यासाठी मिळाले असून, "सकाळ' महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते.

Web Title: ranbhul treasures of grassland