‘फ्लोअर हॉकी’साठी ऑस्ट्रियाला ‘भरारी’

- गायत्री वाजपेयी
शनिवार, 11 मार्च 2017

पुणे - एखाद्या गोष्टीची आवड, त्यासाठी काम करण्याची तयारी, जिद्द आणि मार्गदर्शन मिळाले, की अवघड गोष्टही साध्य करता येते. याचाच प्रत्यय रंजना प्रजापती (मतिमंद) या विशेष मुलीने थेट स्पेशल ऑलिंपिकमध्ये ‘फ्लोअर हॉकी’ या खेळासाठी सहभाग नोंदवून दिला आहे.

पुणे - एखाद्या गोष्टीची आवड, त्यासाठी काम करण्याची तयारी, जिद्द आणि मार्गदर्शन मिळाले, की अवघड गोष्टही साध्य करता येते. याचाच प्रत्यय रंजना प्रजापती (मतिमंद) या विशेष मुलीने थेट स्पेशल ऑलिंपिकमध्ये ‘फ्लोअर हॉकी’ या खेळासाठी सहभाग नोंदवून दिला आहे.

ऑस्ट्रिया येथे १४ मार्च रोजी स्पर्धा होत असून, आज (ता. १०) दिल्लीतून रंजनाने ऑस्ट्रियातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘भरारी’ घेतली आहे.
मूळची राजस्थानची रंजना आणि तिचा भाऊ दोघेही पुण्याच्या कामायनी संस्थेचे विद्यार्थी आहेत. रंजनाच्या वडिलांचे मिठाईचे दुकान आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी रंजना आणि तिचे कुटुंबीय पुण्यात आले. स्वभावाने शांत आणि लाजाळू असणारी रंजना खेळामध्ये आणि इतर कामांमध्ये नेहमीच पुढे असते. अतिशय मन लावून ती कोणतेही काम करते. रंजनामधील हॉकी या खेळाबद्दलची जिद्द पाहून तिचे क्रीडा प्रशिक्षक दैवत लिम्हण यांनी तिला विविध स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहनही दिले. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून देशाचे, कुटुंबाचे आणि संस्थेचे नाव सार्थ कराण्याचा तिचा मानस आहे.

बर्फात खेळतात ‘फ्लोअर हॉकी’ 
ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजकांकडून विशेष मुलांसाठी आयोजित हा ‘फ्लोअर हॉकी’ खेळ संपूर्णपणे बर्फात खेळला जातो. यामध्ये बॉलऐवजी एका डिशचा वापर होतो. काठीने ही डिश उडवून गोल करायचा असतो. यासाठी गेली तीन वर्षे रंजनाचा कसून सराव सुरू आहे. विशेष म्हणजे सुटीमध्ये तिचा भाऊ तिला सरावात सहकार्य करतो आहे. 

विशेष मुलांमध्ये देखील अनेक प्रकारची कौशल्ये असतात. खेळाबरोबरच ते इतरही अनेक क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करू शकतात. मात्र अनेकदा केवळ पालकांच्या अतिकाळजीपोटी ही मुले चांगल्या संधीपासून वंचित राहतात. संस्थेमध्ये रंजनाप्रमाणेच उत्कृष्टपणे खेळणारे अनेक विद्यार्थी आहेत; मात्र पालकांनी अतिकाळजी न करता त्यांना विविध शिबिरांना जाण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
  - सुजाता आंबे, प्राचार्या, कामायनी संस्था 

Web Title: ranjana prajapati selected to flour hockey