पन्नास लाखांच्या खंडणीत 'वाहतूक पोलिसाचाही' समावेश; गुन्हा दाखल असूनही तपासात दिरंगाई

The ransom of Rs 50 lakh includes the traffic police
The ransom of Rs 50 lakh includes the traffic police

कात्रज : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांच्याकडे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल पन्नास लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मार्च 2020 मध्ये भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाईस विलंब होताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणामध्ये पुणे शहर पोलीस दलातील एका वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश असून तो सध्या येरवडा वाहतूक शाखेत कार्यरत आहे.

सोनाली सोनवणे (सध्या रा. लोणी काळभोर), सचिन चव्हाण (रा. हडपसर), राहुल वेताळ (रा. कदम-वाकवस्ती), विकास ईश्वर तुपे (रा. हडपसर), रत्नमाला वेताळ (रा.कदम-वाकवस्ती), मालन पवार (रा.लोणी काळभोर) आणि पप्पू उर्फ संदिप शिंदे (रा. हडपसर) अशी या खंडणी प्रकरणात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे असून यामध्ये सखोल तपास झाल्यास आणखीही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता आहे. खंडणी प्रकरणात निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये पुणे शहर पोलीस दलात येरवडा वाहतूक शाखेत सध्या कार्यरत असलेल्या राहुल वेताळ या पोलीस कॉन्स्टेबलचेही नाव समोर आले आहे. असे असतानाही या प्रकरणी पोलीस तपास अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा आरोप तक्रारदार निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांनी केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2013 साली सोनाली सोनवणे ही महिला आपल्या पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी फुरसुंगी पोलीस चौकीत आली होती. तेथे कार्यरत असलेले तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मदने यांच्याशी तिची ओळख झाली. पुढे ओळख वाढत गेल्यानंतर संबंध वाढत गेले व दत्तात्रय मदने यांचे नातेवाईक आणि सोनाली सोनवणे यांनी एकत्रित कपड्याचे दुकान सुरू केले. पुढे काही कारणांनी दत्तात्रय मदने आणि सोनाली सोनवणे यांच्यात मतभेद वाढत गेले. यादरम्यान दत्तात्रय मदने यांची पदोन्नती होऊन ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते.

संबंधित महिला सोनाली सोनवणे हिने एक दिवस मदने यांना फोन करून, "दोन दिवसात पन्नास लाख रुपये रोख आणून द्यायचे, नाहीतर तुला रस्त्यावर आणते" असे म्हणत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यासाठी सोनवणेला निष्पन्न झालेल्या आरोपींची मदत मिळत होती. पैसे देण्यास दत्तात्रय मदने यांनी नकार दिल्यानंतर सोनाली सोनवणे हिने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दत्तात्रय मदने यांच्याविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची तक्रार दिली. यानंतर पुणे शहर पोलीस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. मात्र, दोनच दिवसांमध्ये संबंधित महिला सोनाली सोनवणे हिने गैरसमजुतीने दत्तात्रय मदने यांचे विरोधात तक्रार दिली असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. लष्कर कोर्टापुढे कोणतीही तक्रार नसल्याबाबत जबाबही नोंदवला आणि वैद्यकीय तपासणीस नकार दिला. पुढे काही दिवसानंतर संबंधित महिला सोनाली सोनवणे हिने पुन्हा जबाब फिरवले. मात्र याबाबत कोणतेही पुरावे सोनवणे ही कोर्टापुढे सादर करू शकली नाही.

यादरम्यान, दत्तात्रय मदने यांनी पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागितली. पोलीस तक्रार प्राधिकरणाने सोनाली सोनवणे व संबंधितांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची नोटीस काढल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्याची नोंद झाली. मात्र, याबाबत पोलीस तपास करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा व दोषींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मदने यांनी केला आहे.

'लिव्ह इन रिलेशनशिप'चे दस्त हाती लागल्याने भांडाफोड
पतीबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सोनाली सोनवणे ही सचिन चव्हाण या व्यक्ती बरोबर 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहत होती. 5 ऑक्टोबर 2018 रोजी सचिन चव्हाण आणि सोनाली सोनवणे यांच्यात झालेला लिव्ह इन रिलेशनशिपचा करारनामा समोर आल्याने सोनवणे हिच्या कारणाम्यांचा भांडाफोड झाला.

सोनवणेकडे एक कोटीची संपत्ती
पतीबरोबर घटस्फोट झाल्यानंतर केवळ दोन ते तीन वर्षांत सोनाली सोनवणे हिने भुखंड, दुकान अशी जवळपास सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे. विशेष म्हणजे घटस्पोट होताना सोनवणे हिने कोणतीही पोटगी घेतलेली नाही. त्यामुळे तिने एवढी मोठी संपत्ती कशी जमवली याचीही चौकशी व्हावी अशी मागणी मदने यांनी केली आहे. तसेच सोनवणे हिने इतरांनाही फसवले असण्याची शक्यता मदने यांनी वर्तवली आहे.

गुन्हा दाखल होऊनही राहुल वेताळचे निलंबन का नाही?
खंडणी सारखा गंभीर गुन्हा दाखल असूनही येरवडा वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या राहुल वेताळ यास अद्यापपर्यंत निलंबित करण्यात का आले नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व मला निलंबित करण्यात आले. माझी सामाजिक प्रतिमा मलीन करण्यात आली. कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही मानसिक तणावाखाली असताना मी चौकशीला सामोरे गेलो. माझ्यावर जशी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तशीच तत्परता राहुल वेताळ यांचे निलंबन करण्यासाठी का दाखवली जात नाही? वरिष्ठांकडून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे? असे संतप्त प्रश्न दत्तात्रय मदने यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.

''खूप दिवसांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणातील आरोपींकडून न्यायालयामार्फत जामीनासाठी प्रयत्न केला जात आहे. नुकताच मी पोलिस स्टेशनचा चार्ज घेतला असून मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहे. या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास सुरु आहे ''
- जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com