'आहे तसे घेतो, पाहिजे तसे घडवतो'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - ""निवडणुकीच्या वेळी इतर पक्षांतून काही मंडळी भाजपमध्ये आली तरी, काही प्रॉब्लेम नाही; कारण आम्ही आहे तसे घेऊन पाहिजे तसे घडवितो,'' असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आयारामांच्या पक्ष प्रवेशाबद्दलची भूमिका सोमवारी स्पष्ट केली. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच महापालिका निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचे शत्रू असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या उमेदवारांना सिंहगडावर शपथ दिल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे या प्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्‍मा यांच्या पक्ष प्रवेशाबाबत दानवे म्हणाले, ""निवडणुकीत पक्षनिष्ठेइतकेच संख्याबळ महत्त्वाचे असते. महापालिका काबीज करण्यासाठी निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची आहे. त्याचा विचार करून सहमतीने उमेदवार निश्‍चित करण्यात आले आहेत.''

भाजपचा जनाधार वाढत असल्यामुळे अन्य पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. मात्र, पक्षात कोणीही आले तरी, त्यांच्यात बदल होईल, पक्षाच्या विचाधारेत नाही, असे त्यांनी रेश्‍मा भोसले यांच्यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून सातत्याने भाजपवर टीका होत असल्याबद्दल ते म्हणाले, ""बाळासाहेब ठाकरे यांनी युती तुटली तरी कटुता ठेवू नये, असे पूर्वी सांगितले होते. मात्र, शिवसेना सध्या आरोप करून वातावरण प्रदूषित करण्याचे काम करीत आहे. तरीही भाजप विचार घेऊन मतदारांसमोर जाणार आहे. सेनेच्या आरोपांना मतदारच उत्तर देतील.'' महापालिका निवडणुकीनंतर कोणाशी युती करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे सांगत सर्वत्र भाजप पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. निवडणुकीनंतर मनसेशी युती करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने अखंड महाराष्ट्राची शपथ घेऊन दाखवावी, असे आव्हान शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याबाबत दानवे यांनी छोट्या राज्यांची भाजपची पहिल्यापासूनच भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: raosaheb danve press conference