अण्णासाहेबांच्या योगदानाची नोंद अपुरी - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

पुणे - ""दुर्गम भागातून पुढे आलेल्या शिंदे परिवाराने ग्रामीण जनता आणि शेतीशी कायम बांधिलकी जपली होती. रावसाहेब शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि अण्णासाहेबांनी कृषी क्षेत्रातील योगदानातून ग्रामीण भागातील जनतेची अस्मिता जागी केली. या कुटुंबाच्या शिक्षण, शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाची हवी तेवढी नोंद घेतली गेली नाही,'' अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब शिंदे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कारांचे पवार यांच्या हस्ते वितरण झाले, त्या वेळी ते बोलत होते. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक ना. धों. महानोर, बाळासाहेब थोरात यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. संदीप वासलेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. पी. डी. पाटील, मधुकर भावे, सचिन ईटकर, उद्धव कानडे, मनोहर कोलते आदी उपस्थित होते. रावसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणारे डॉ. बाळासाहेब शेंडगे आणि रवींद्र डोमाळे यांचा "कार्यकर्ता पुरस्कार' देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

""अण्णासाहेब आणि रावसाहेब या दोघांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकांच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. डॉ. सुब्रह्मण्यम यांच्यासोबत अण्णासाहेबांनी केलेली पहिली हरितक्रांती दुर्लक्षून चालणार नाही. शेती आणि पाणी व्यवस्थापनाबाबत त्यांनी दाखविलेल्या कर्तृत्वाची नोंद घेतली गेली नाही, याची खंत नेहमी जाणवते. अण्णासाहेबांच्या निर्णयांमुळे ग्रामीण शेती अर्थव्यवस्था बळकट झाली हे सिद्ध होते. त्यांनी लावलेले शोध आणि शेतकऱ्यांच्या कष्टामुळे हरितक्रांती झाली. रावसाहेबांना समाजातील चांगले लोक हेरून काढण्याचा जणू छंदच होता. चांगल्या, गुणी व्यक्तीशी सातत्याने संवाद ठेवणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू होता. राजकारणात त्यांना संधी होती, त्याविषयी विचारणा केल्यानंतर त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि अण्णासाहेबांच्या मागे उभे राहिले. संस्थेचा कारभार पारदर्शक आणि शिस्तीत चालला पाहिजे, याबाबत ते आग्रही असायचे. आजचे पुरस्कारार्थी कोणत्या ना कोणत्या संदर्भाने त्यांच्या विचारांशी प्रामाणिकता जपणारे आहेत,'' असे पवार म्हणाले.

पुरस्कारार्थी डॉ. काकोडकर, महानोर आणि थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. इतर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईटकर यांनी, तर कानडे यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर कोलते यांनी आभार मानले.

Web Title: Raosaheb Shinde Awards