Independence Day : भारतीय स्वातंत्र्याच्या पाऊलखुणा अवतरल्या पुणेकरांच्या दारी

Simla-Conference-NFAI
Simla-Conference-NFAI

स्वातंत्र्यदिन : पुणे : भारताला स्वातंत्र्य मिळण्याची ती चाहूल होती. दुसरे महायुद्ध संपले होते आणि ब्रिटीशांना भारताला स्वातंत्र्य द्यावे लागेल, असे स्पष्ट दिसू लागले होते. 1945 मध्ये झालेली सिमला परिषद म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या पाऊलखुणा होत्या. तब्बल 74 वर्षांपूर्वीच्या या पाऊलखुणा पुणेकरांच्या दारी आता अवतरल्या आहेत. सिमला परिषदेची अत्यंत दुर्मिळ चित्रफीत पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखल झाली आहे. 

सिमला परिषदेतील ऐतिहासिक क्षण तत्कालीन नौदलातील (रॉयल नेव्ही) अधिकारी विल्यम टेलर यांनी चित्रित केले होते. टेलर आज हयात नाहीत. मात्र त्यांची कन्या मार्गारेट साऊथ या ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी ही चित्रफीत जपून ठेवण्यासाठी संग्रहालयाकडे आवर्जून पाठवून दिली आहे. चित्रफितीमध्ये त्या वेळी परिषदेला उपस्थित असलेले महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपलाचारी, महंमद अली जीना, राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक दिग्गज नेते आहेत. 

संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, "भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा हा ऐतिहासिक क्षण होता. त्याची चित्रफीत आपल्याकडे उपलब्ध झाली, ही आनंदाबरोबरच अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल मार्गारेट साऊथ यांना धन्यवाद द्यायला हवेत. सिमला येथील व्हाइसरिगल लॉज येथे 25 जून ते 14 जुलै 1945 या काळात ही परिषद झाली होती. त्या वेळी अनेक नेते एकमेकांशी हिरवळीवर चर्चा करताना दिसत आहेत. महात्मा गांधी बैठकीनंतर परतताना दिसत आहेत. त्यापूर्वी व्हाइसराय लॉर्ड वॉवेल हे नेत्यांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. कुणाकडे अशा प्रकारची दुर्मीळ चित्रफीत असल्यास जतन करण्यासाठी संग्रहालयाकडे आवश्‍य द्यावी.'' 

मार्गारेट यांनी संग्रहालयास पाठविलेल्या पत्रात, "टेलर हे चांगले छायाचित्रकार होते. त्यांच्याकडे आठ एमएम सिने कॅमेरा होता,' असे म्हटले आहे. "टेलर यांना फार उच्च दर्जाचे चित्रीकरण करता आले नाही; परंतु एक ऐतिहासिक क्षण मात्र त्यांनी टिपला आहे. टेलर यांनी नंतर सिमला येथे भेटही दिली होती. 2010 मध्ये त्यांचे निधन झाले. या चित्रीकरणाचे भारतात जतन होत आहे, याचा त्यांना अभिमान वाटला असता,'' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com