रस-भाव-रंजन नाट्य महोत्सव पुण्यात रंगणार

रस-भाव-रंजन नाट्य महोत्सव पुण्यात रंगणार

पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केलेले भरत नाट्य संशोधन मंदिर आणि रोटरी इंडियाच्या शतकपूर्तीनिमित्त रस-भाव-रंजन नाट्य महोत्सवाचे आयोजन 15 ते 22 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. रंगभूमीचे वैभव असलेल्या गाजलेल्या नाट्यकृती या महोत्सवात रसिकांना पाहता येणार आहेत. 

भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, रोटरीचे प्रांतपाल रवी धोत्रे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या नाट्य महोत्सवाची माहिती दिली. या वेळी अभय जबडे, संजय डोळे उपस्थित होते. हा नाट्य महोत्सव भरत नाट्य मंदिरात होणार असून, महोत्सवाचे उद्‌घाटन 15 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता होणार आहे. अनेक वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत असलेल्या रंगकर्मींचा तसेच नाट्य संस्थांचा सन्मानही या महोत्सवात केला जाणार आहे. 

याविषयी पानसे म्हणाले, ""यंदाच्या विजयादशमीला भरत नाट्य संशोधन मंदिराने 125 वर्षे पूर्ण केली आहेत. चांगल्या नाट्यकृती रसिकांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट असल्याचे रस-भाव-रंजन नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही अधोरेखित करीत आहोत.'' 

धोत्रे म्हणाले, ""रोटरीच्या माध्यमातून नाट्य महोत्सव पहिल्यांदाच घेण्यात येत असल्याने जुन्या-नव्या कलाकृतींना रसिकांसमोर पुन्हा आणता येणार आहे. रसिकांनी पूर्वी डोक्‍यावर घेतलेली नाटके पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' 
जबडे म्हणाले, ""पु. ल. देशपांडे यांच्या "तीन पैशाचा तमाशा' या नाटकाने महोत्सवाची सुरुवात होत आहे. हे नाटक 30 अंध कलाकार सादर करणार आहेत. याचबरोबर "मृच्छकटीक' हे नाटक नव्या स्वरूपात रसिकांसमोर येणार आहे.'' 

महोत्सवातील नाट्यकृती 
15 डिसेंबर - तीन पैशाचा तमाशा (लेखक पु. ल. देशपांडे) 
16 डिसेंबर - साठा उत्तराची कहाणी (केशव केळकर) 
17 डिसेंबर - आवर्त (अनिरुद्ध रांजेकर) 
18 डिसेंबर - चांदणे शिंपीत जा (मधुसूदन कालेलकर) 
19 डिसेंबर - सासूबाई चार्ज सोडा (संजय डोळे) 
20 डिसेंबर - सभ्य गृहस्थ हो (जयवंत दळवी) 
21 डिसेंबर - संगीत मृच्छकटीक (गो. ब. देवल) 
22 डिसेंबर - मोरूची मावशी (प्र. के. अत्रे) 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com