बारामती, इंदापूरवरही रासपचा दावा 

rsp
rsp

बारामती शहर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व दौंड या तीन जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाने दावा सांगितला असून, भाजप व शिवसेना युतीकडून या तीन जागा मिळाव्यात, असे पक्षाचे नेते व अहल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणूक रासप भाजपसोबत महायुतीतून लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

दोडतले यांनी आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजप सेना युतीचा मित्रपक्ष असून, महादेव जानकर यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाने 52 जागांची मागणी युतीकडे केली असून, पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व दौंड या जागांची मागणी त्यात आहे. दौंडमध्ये सध्या पक्षाचा विद्यमान आमदारच आहे. बारामती व इंदापूरमध्येही पक्षाची ताकद चांगली असल्याने या दोन्ही जागा मिळाव्यात, असा आग्रह आहे. याबाबत अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही. गेल्या निवडणुकीत रासपला दिलेल्या पाच जागा देण्याचे भाजपने मान्य केले आहे. 

या वेळी माणिकराव दांगडे पाटील, संदीप चोपडे, विलास देवकाते, शैलेश थोरात, विठ्ठल देवकाते, काका बुरुंगले, प्रमोद देवकाते, अविनाश मासाळ, दत्ता ढाकणे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, पक्षाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त 25 ऑगस्ट रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे महामेळाव्याचे आयोजन केले असून, पुणे जिल्ह्यातून एक लाख कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जाणार असल्याचे दोडतले यांनी सांगितले. 

मेंढपाळांना बंदुकीचे परवाने द्या... 
राज्यातील पहिले शेळी मेंढी संशोधन केंद्र पारनेर (जि. नगर) तालुक्‍यातील ढवळपूर येथे सुरू करणार असून, पुणे जिल्ह्यातही अशा केंद्रासाठी जागा शोधत असल्याचे दोडतले यांनी नमूद केले. युवकांना पूरक उद्योग करता यावा, यासाठी मदत केली जाणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मेंढपाळ व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेले हल्ले विचारात घेता त्यांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना द्यायला हवा, अशीही मागणी बाळासाहेब दोडतले यांनी केली. याबाबत संबंधितांशी आपण बोलणार असून, रानावनात फिरणाऱ्या मेंढपाळांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बंदुकीची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com