नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने भिगवण येथे रास्तारोको

प्रशांत चवरे
शनिवार, 7 जुलै 2018

भिगवण (पुणे) : नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच युवक धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षा मागण्यांस गेले असता त्यांना मुले चोरणारी टोळी समजून जमावाने अमानुषपणे मारहाण करून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने येथे शुक्रवारी (ता.06) निषेध मोर्चा काढुन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. घटनेची न्यायालयीन चौकशी करुन मृतांच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी देण्याची आग्रही मागणी मोर्चेकऱ्यांच्या वतीने  करण्यात आली.

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथपंथी डवरी समाजातील पाच जणाना मारहाण करुन हत्या करण्यात आली होती. घटनेच्या निषेधार्थ नाथपंथी डवरी समाज युवा संघाच्या वतीने निषेध मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मदनवाडी चौफुला (ता.इंदापुर) येथून निषेध मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मदनवाडी, तक्रारवाडी, भिगवण मुख्य पेठेतून निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, माजी सभापती रमेश जाधव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तेजस देवकाते, धनाजी थोरात, तुकाराम बंडगर, कुंडलिक बंडगर, इंदापूर तालुकाध्यक्ष संजय शिंदे, प्रा. नवनाथ सावंत, विशाल शिंदे, दिनेश शिंदे, भगवान शेगर, मोहन शेगर, रमेश आहेर, विश्वनाथ आहेर, अर्जुन शिंदे, शरद चितारे आदींसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये मदत जाहीर करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, मृतांच्या वारसाना शासकीय नोकरी देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांना देण्यात आले. निषेध मोर्चा व रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: rasta roko of nathpanthi dawari community at bhigwan