रेशनच्या धान्यासाठी कर्वेनगरमध्ये हेलपाटे

Ration-Card
Ration-Card

पौड रस्ता - रास्त धान्य (रेशन) आमच्या हक्काचं आहे; पण आता दुकानात गेलो की दुकानदार म्हणतो द्या अंगठा. अंगठा दाखवला की तुमचा अंगठा जुळत नाही, अर्ज भरा, असे सांगितले जाते. अर्ज मागितला तर तो म्हणतो रेशन कार्यालयातून आणा. कार्यालयात गेलो तर तेथे अर्ज उपलब्ध नसतो. हेलपाटे मारून त्रस्त झालो आहे, अशी खंत कर्वेनगर येथील दत्ताराम उत्तेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

कोथरूड परिसरात एकूण ६८,६०८ शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या जास्त आहे. अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत दरमहिन्याला अन्नसुरक्षा कार्डधारकास ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मिळणे अनिवार्य आहे. मात्र रेशन दुकानदार विविध कारणे देऊन धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

याबाबत गाढवे कॉलनीत राहणाऱ्या अंजली पवार म्हणाल्या, की रेशनवर धान्य मागायला गेल्यावर दुकानदाराने प्रथम अंगठा लावायला सांगितला. त्या दिवशी दुकानातून लगेच धान्य मिळाले. नंतर गेले चार महिने धान्य मिळाले नाही. दुकानदाराला विचारले असता त्याने नव्याने अर्ज भरण्यास सांगितले. मात्र दोन वेळा अर्ज भरूनदेखील अद्याप धान्य मिळाले नाही. पुढे करायचे काय, असा प्रश्‍न पडला आहे. सागर कॉलनीत राहणाऱ्या सुजाता कुडले यांचे रेशनचे दुकान लांब होते म्हणून जवळच्या रेशन दुकानातून त्यांनी धान्य घेतले. 

पोर्टेबिलिटीमुळे त्यांना त्या वेळी ताबडतोब धान्य मिळाले. मात्र दुसऱ्या महिन्यात त्यांना धान्य मिळाले नाही. जुन्या दुकानात गेल्यावर मागच्या महिन्यात जेथून धान्य घेतले तेथूनच धान्य घेण्यास त्यांना सांगण्यात आले. आता त्यांना कोणत्याही दुकानातून धान्य मिळत नाही. याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एका रेशन दुकानदाराने सांगितले, की दिवाळीत उडीदडाळ २५ टक्के मिळाली. आम्हाला मिळालेल्या प्रत्येक धान्याचा आम्ही हिशेब देत असतो. अंगठा जुळत नसेल तर धान्य देता येत नाही. कारण आता सगळी नोंद ऑटोमॅटिक होते.  याबाबत अन्नपुरवठा विभागाचे रमेश कदम, रमेश सोनवणे यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

कार्यकर्त्यांचा पाठपुरावा
कोथरूडमधील मनसेचे कार्यकर्ते संजय काळे, सचिन वीप्र, गणेश शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधल्यावर त्यांच्याकडे याबाबत शंभराहून अधिक तक्रार अर्ज आले. त्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्या सोडवून होणाऱ्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

नागरिक म्हणतात
     दिवाळीत अन्नसुरक्षा शिधापत्रिकाधारकांना साखर, चणाडाळ, उडीद डाळ मिळालीच नाही
     दुकानदार पावती देत नाहीत. 
     नियमानुसार दुकान खुले ठेवत नाहीत.
     मागील महिन्यातील न मिळालेले धान्य दुसऱ्या महिन्यात मिळत नाही.

४४ - कोथरूडमधील रेशन दुकाने 
६८,६०८ - एकूण शिधापत्रिकाधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com