रेशनची साखर महागली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

प्रतिकिलो दीड रुपये वाढ; दरवाढीसाठी केंद्राची परवानगी
पुणे - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या राज्य सरकारने शिधापत्रिकेवरील साखरेचे दर प्रतिकिलो दीड रुपयाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिकिलो दीड रुपये वाढ; दरवाढीसाठी केंद्राची परवानगी
पुणे - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या राज्य सरकारने शिधापत्रिकेवरील साखरेचे दर प्रतिकिलो दीड रुपयाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमधील वाढ आणि वाहतुकीचे दर वाढवून देण्याची वाहतूकदार संघटनांनी केलेली मागणी यामुळे शासनाने ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत 13.50 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी साखर आता 15 रुपये दराने मिळणार आहे.

राज्यातील शिधावाटप दुकानदारांच्या संघटनांकडून साखरेच्या वितरणाकरिता कमिशन वाढवून देण्याची मागणी वारंवार शासनाकडे करण्यात येत होती. साखरेची वाहतूकदेखील नियमित व्हावी, यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना वाहतुकीचे दर मागील वर्षी वाढवून देण्यात आले आहेत. राज्यावर आर्थिक बोजा पडत असेल, तर साखरेचे दर वाढविण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्य शासनाला दिली आहे.

शहरी भागात 15 हजार रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या (अंत्योदय) आणि 15 ते 69 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा प्रतियुनिट (माणशी) पाचशे ग्रॅम साखर उपलब्ध करून दिली जाते. ग्रामीण भागात 15 ते 45 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनाही प्रतियुनिट तेवढीच साखर दरमहा उपलब्ध करून दिली जाते. सणासुदीच्या काळात त्यामध्ये दीडशे ग्रॅमने वाढ करण्यात येते.

सात लाखांहून अधिक नागरिकांना फटका
पुण्यासह पाच जिल्ह्यांत मिळून एकूण 7 लाख 67 हजार शिधापत्रिकाधारकांना साखरेचे वाटप होते. राज्यात ही संख्या दोन कोटींच्या वर आहे. त्या सर्वांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. ही दरवाढ या महिन्यापासून लागू करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: ration sugar rate increase